Ahilyanagar News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे खून प्रकरण राज्यात सध्या गाजत आहे. यावरून बीड जिल्ह्यात चांगलेच वातारण तापलेले आहे. आता याची झळ अहिल्यानगर जिल्ह्यास देखील बसण्यास सुरुवात झाली आहे.
नुकतीच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे राज्यसरचिटणीस ऍड. प्रताप ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याची सखोल चौकशी होऊन प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या प्रत्येकावर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, भावनेच्या भरात आष्टीचे आ.सुरेश धस व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया हे वंजारी समाजाबद्दल दिशाभूल करणारे वक्तव्य करून समाजात विष पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांनी हा प्रकार थांबवावा, असे आवाहन केले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आ. धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोपींवर वरदहस्त असणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी करतानाच बीड जिल्ह्यात एकाच बिंदूनामावलीचे अधिकारी कसे काय? असा आरोप केला होता. त्या वक्तव्यावर आक्षेप घेत ऍड. ढाकणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले की, गुन्हेगाराला कोणतीही जात, धर्म, पक्ष नसतो. ती एक वृत्ती असते. मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या खून प्रकरणाचे काहीजण राजकीय भांडवल करीत आहेत. या खून प्रकरणावरून आ. धस वंजारी समाजाला टार्गेट करत आहेत. बिंदूनामावलीबाबत सवाल उपस्थित करून आ. धस वंजारी समाजाकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे समाजाची बदनामी होत आहे.
अंजली दमानिया यांच्याबद्दल आदर आहे, मात्र, निनावी पत्राचा आधार घेत त्याही समाजाबाबत गैरसमज पसरवणारे विधान करीत आहेत. स्वार्थापोटी एखाद्या जातीबद्दल जाणीवपूर्वक द्वेष पसरविला जात आहे. ढाकणे म्हणाले, की आरक्षणाबाबत आम्ही तुम्हाला विरोध केला का? आम्हाला घटनेने अधिकार दिला आहे.
केंद्रात वंजारी समाजाला १६ टक्के आरक्षण आहे. बीड प्रकरणात हा विषय आला कसा? घाणेरड्या राजकारणासाठी जातीद्वेष मनातून काढा. धस यांनी केलेले वक्तव्य जाणीवपूर्वक असून, हा एका जातीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.