Ahilyanagar News : रस्त्याने भरधाव वेगात जात असलेल्या कारला अचानक आग लागते. मात्र नेमके याच वेळी अचानक हिरो इंट्री करतो अन कारमधील सर्वांची सुटका करतो. असे दृश्य आपण आजपर्यंत चित्रपटातच पहिले आहे.
मात्र काल हेच दृश्य कोपरगावात घडले आहे. एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. या कारमध्ये एकाच कुटुंबातील पाचजण प्रवास करीत होते. चारच्या समोरील बाजूने मोठ्या प्रमाणात जाळ व धूर निघत असल्याने कारमधील पाचजण अडकून पडले होते. मात्र परिसरातील तरुणांच्या मदतीमुळे कारमधील सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, आई, वडील, दोन मुले व जावई असे पाचजण फोर्ड कारने नाशिकहून कोपरगावला निघाले होते. कोपरगाव येथील एका हॉस्पिटलमध्ये असलेल्या आपल्या सुनेला भेटण्यासाठी ते नाशिकवरून कोपरगावला येत होते.
हे सर्वजण गोकूळ नगरी परिसरातील टाइनी टॉस स्कूलसमोर आले असता दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांच्या धावत्या गाडीने अचानक पेट घेतला.
पेट घेतलेल्या (एमएच ०४ एफए ६९७६) या क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या फोर्ड कारमधून सलीम शेख, तसलीम शेख, जागीर सलीम शेख, अमान एजाज शेख व फरीदा अमान शेख असे एकूण पाचजण प्रवास करीत होते. यावेळी बघ्याची भूमिका न घेता काही तरुणांनी प्रसंगावधान राखत गाडीतील सर्वांना खाली उतरवले आणि सुरक्षित अंतरावर नेऊन सोडले.
त्यानंतर गाडीचे बोनेट उघडून पेटलेल्या मशीनवर पाणी मारत आग आटोक्यात आणली. गाडीची बॅटरी ओढून बाहेर फेकल्याने आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.
शहरातील या तरुणांनी मोठे धाडस दाखवत कारला लागलेली आग आटोक्यात आणली. तरुणांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे पाचही जणांचा जीव बचावला.
तरुणांनी केवळ आगच विझवली नाही, तर घाबरलेल्या कुटुंबाला दिलासाही दिला. एका तरुणाने घटना घडल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवली.
त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत नगरपालिकेची अग्निशमन गाडी या ठिकाणी पोहोचली. नाशिकवरुन आलेल्या या गाडीमध्ये एक गर्भवती महिला देखील होती.