Ahilyanagar News : यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपातील सर्वच पिके जोमात आली होती. त्यामुळे शेतकर्यांनी जादाचे उत्पन्न मिळावे, यासाठी पिकांची मशागत व रासायनिक खते, औषधे यावर मोठा खर्च केला. मात्र, त्यानंतर सतत अवेळी झालेल्या अतिवृष्टीने परिसरातील कपाशी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.
कापसात उन्हामुळे घट होऊ नये, म्हणून शेतकरी शेतमजुरांच्या दारी खेट्या मारत असल्याचे चित्र दिसत आहे. दिवाळीमुळे शेतात काम करण्यासाठी कोणीही येत नसल्याने शेतकरी कुटुंबांना दिवाळी शेतातच साजरी करावी लागली आहे.सध्या मजूर निवडणुकीच्या धुंदित दिसले.आता मात्र निवडणुकीची धुंदी उतरली असण्याची काहीशी चिन्हे आहेत.
अनेक गावांतील काही मजूर परगावी जाऊन काम करत आहेत. यात वाहन चालकाकडे १५ ते २० मजुरांचा टोळी असते. तो चालक शेतकर्यांकडून आधीचे पैसे घेऊन मजुरांना घेऊन जातो. त्यात त्याच्या वाहनाचेही भाडे द्यावे लागत आहे. सध्या अनेक तालुक्यात मजूर मिळत नसल्याने म्हणजे, तालुक्यातील दुसऱ्या गाव गावातून सध्या मजुरांची वाहतूक करण्यात येत असल्याचे अनेक शेतकर्यांनी सांगितले.
कापूस वेचणीसाठी मजुरांची वानवा जाणवत आहे. त्यामुळे कपाशी उत्पादक अडचणीत सापडले आहेत. वाढीव दर देऊनही शेतकर्यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनात. खरिपातील कापूस वेचणीस आला असून पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कपाशीची वेचणी करण्यास मजुरांची वानवा आहे.
दहा ते बारा रुपये प्रति किलो मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात आले.
सध्या शेतकरी कापसाच्या अंतिम वेचणीत व्यस्त आहेत. त्यात दिवाळी, पाडवा, भाऊबीजेची धामधूम आली. यामुळे शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे शेतमजुरांकडून मजुरीचे दर वाढविण्याची मागणी करण्यात आली.
दुसरीकडे अनेक ठिकाणी वाढीव मजुरी देवूनही शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक ठिकाणी शेतकर्यांकडून कापूस वेचणीसाठी दहा रुपयांपासून पंधरा रुपयांपर्यंत मजुरी देण्यात आली. मात्र, सध्या मजूर निवडणुकीच्या धुंदित दिसले.आता मात्र निवडणुकीची धुंदी उतरली असण्याची काहीशी चिन्हे आहेत.