Ahilyanagar News : कोण म्हणते शेती परवडत नाही, योग्य नियोजन अन आधुनिक तंत्रज्ञाचा ताळमेळ घालत शेती केली तर निश्चितच शेती परवडते. याचे उदाहरण अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील युवा शेतकरी कल्याण शंकर जाधव यांनी अवघ्या तीस गुंठे क्षेत्रात १२ लाखांचे उत्पादन घेत किमया साधली आहे.

नगरी डाळिंबाची परदेशातही भुरळ पडल्याचे पहावयास मिळते. नगरचे डाळिंबाची संयुक्त अरब अमिराती, बहारीन, सौदी अरेबिया, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया तसेच युरोपियन देशांमधील इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड या ठिकाणी निर्यात करण्यात येते.

तसा डाळिंब उत्पादनासाठी जगात भारत हा आघाडीवर असणारा देश आहे. देशातील सुमारे ६०टक्के डाळिंबाचे उत्पादन हे फक्त महाराष्ट्र राज्यात होत आहे. सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, पुणे, सातारा, धाराशिव हे डाळिंब उत्पादनासाठी मुख्य जिल्हे म्हणून ओळखले जातात.

अहिल्यानगर मधील नगर तालुका तर डाळिंब उत्पादनासाठी आघाडीवर आहे. गेल्या काही वर्षांपासून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलत असून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बाब ठरत आहे.

अहिल्यानगर तालुका हा तसा पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथील शेतीला शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने संपूर्ण शेती ही निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे. त्यामुळे येथील शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणीत पहावयास मिळतो.

त्यामुळे शेतकऱ्यांसमोर डाळिंब उत्पादन हा चांगला पर्याय भविष्यात उपलब्ध होऊ शकतो. आधुनिक शेती तंत्राचा वापर व कृषी तज्ञांच्या सल्ल्याने डाळिंबाच्या बागेची निगा राखली तर शेतकऱ्यांना मोठा लाभ होतो. विशेष औषधी गुणधर्म असल्याने डाळिंबाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढत असल्याचे समोर आले आहे.

जाधव यांनी ३० गुंठे क्षेत्रात शासकीय योजनेतून सन २०२१-२२ मध्ये ३२५ झाडांची लागवड केली होती. रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर करून तसेच पाण्याचे योग्य नियोजन, बाग रोगमुक्त, गांडूळ खताचा वापर यामुळे उत्पादन व गुणवत्ता यात भर पडली.

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये पुणे बाजारपेठेत सुमारे दहा टन मालाची विक्री जाधव यांच्याकडून करण्यात आली. त्यांना कमीत कमी १०० रुपयांपासून तीनशे रुपये प्रति किलो भाव मिळाला. तीस गुंठे क्षेत्रात त्यांना बारा लाखाचे उत्पादन हाती आले.

तालुक्यातील डाळिंबाला परदेशाप्रमाणेच देशातील दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांनी मोठी मागणी असते तर परदेशात दुबई, नेपाळ, बांगलादेश, रशिया या देशांनी भारतीय डाळिंबाला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते.