काय सांगता ‘ती’ पुन्हा येणार ! ; हवामान विभागाने राज्यातील हवामानाबाबत वर्तवला ‘हा’ अंदाज

Ahilyanagar News : राज्यात गेले काही दिवस ढगाळ हवामान व पावसामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे थंडीचा कडाका कमी झाला होता. मात्र, सोमवारपासून हवामान कोरडे राहणार असून, थंडीत पुन्हा वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, रविवारी राज्यात किमान तापमान नाशिक येथे १५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

मागील काही दिवस राज्यभरात मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका जाणवत होता. यात अहिल्यानगर शहराचे राज्यात सर्वात कमी नोंदवले गेले होते. या थंडीमुळे रब्बीच्या पिकांना अनुकूल वातावरण तयार झाले होते तर द्राक्ष बागांना मात्र या कडाक्याच्या थंडीचा फटका बसत होता. जास्त थंडीने द्राक्ष मणी तडकण्याचा धोका असल्याने शेतकरी बागेत शेकोट्या पेटवत होते.

उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांना ढगाळ हवामानामुळे अडथळा झाला होता. त्यामुळे ७ अंशांपर्यंत घसरलेले किमान तापमान सरासरी २० अंशांपर्यंत गेले होते. त्यामुळे कडाक्याची थंडी गायब झाली होती. आता मात्र ढगाळ हवामान कमी होऊ लागले आहे.

त्यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अडथळा कमी होऊन थंडीला पुन्हा सुरुवात होत आहे. पूर्वेकडील कमी दाबाचा पट्टा सध्या आग्नेय अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत समुद्रसपाटीपासून ०.९ किमी उंचीवर आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

कोकण-गोवा व मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. तर कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे.

पाहूया राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई (कुलाबा) २१.२, सांताक्रुझ १९.१, रत्नागिरी २२.१, डहाणू १९, पुणे १८, लोहगाव १८.८, अहिल्यानगर १९.५, जळगाव १६.८, कोल्हापूर १९.५, महाबळेश्वर १५.६, मालेगाव १९.२, नाशिक १५.४, सांगली १९.५, सातारा १९.२, सोलापूर २१.२, छ. संभाजीनगर १८.९, परभणी १८.४, अकोला १९.६, अमरावती १९.३, बुलढाणा १९.०, ब्रम्हपुरी १७.४, नागपूर १९.०, वर्धा १८.६.