Ahilyanagar News : एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याचा विश्वास प्रवाशांमध्ये असल्याने एसटीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र ‘प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणाऱ्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा देण्यात येतात का? महामंडळ खरोखर प्रवाशांच्या जिवाची किती काळजी घेते? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील अकोलेसह इतर अनेक तालुक्यात अनेक ठिकाणी चढ-उतार आणि नागमोडी वळणाचे धोकादायक रस्ते आहेत. अशा ठिकाणी अनेकदा अपघात घडत असतात.

अशावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरीतील प्रथमोपचार पेट्या उपयोगी पडत असायच्या. परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून आगारातील लालपरीत उपलब्ध असलेल्या प्रथमोपचार पेट्या गायब झाल्या आहेत.

त्याचसोबत प्रवाशांकरीता करमणूक म्हणून लावण्यात आलेली वायफाय प्रणालीही बंद अवस्थेत असल्याने एसटीच्या अनेक योजना केवळ कागदावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यासबसमधील प्रवाशांना तातडीने प्रथमोपचार मिळावेत.

या उद्देशाने प्रत्येक एसटीत प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. यात ड्रेसिंगसाठी मलम, कार्टन पट्टीअसे साहित्य असते. चालकाच्या केबिनमध्ये ही पेटी ठेवलेली असते. काही बसमधून या पेट्या गायब झाल्या आहेत. तर काही पेट्यांमध्ये कागद किंवा इतर साहित्य ठेवण्यात आले आहे.

तसेच प्रवासादरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने यंत्र मीडिया सोल्युशन या खासगी कंपनीच्या माध्यमातून गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा सुरू केली होती. नंतर एसटीचा प्रवास- मनोरंजन हमखास अशी जाहिरातबाजी केली होती.

मात्र अनेक गाड्यांमधील वाय-फाय बंद पडल्याचे दिसून येत आहे. वाय-फाय सेवेचा लाभ घेताना एखाद्या प्रवाशाला ठराविक चित्रपट, चित्रपट गीत आणि मालिका पुन्हा पाहण्यासाठी वाय-फाय मेन्यूद्वारे एसएमएस करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती.

मात्र ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने ही सेवा कायमची बंद पडली आहे.तसेच जवळपास सर्वच बसमध्ये आग विझवण्यासाठी असलेले सिलेंडर देखील नसते. त्यामुळे जर एखादी दुर्घटना घडली तर काय करणार असा सवाल उपस्थित होत आहे.