Ahilyanagar News : लाडकी बहीण पुढे दाखवायचे आणि त्या पाठीमागे महाराष्ट्राचा गेम करायचा असे या मागचे चित्र होते. मध्यप्रदेशमध्ये जे केले तेच महाराष्ट्रामध्ये केले.

सत्ताधाऱ्यांना लाडक्या बहिणीचं प्रेम नव्हतं, तर लाडक्या बहिणींच्या आडून ईव्हीएमचा गेम करत लाडकी बहीण योजनेच्या नावावर त्यांनी घातलेला हा ईव्हीएमचा गोंधळ होता. त्याच्या आडून महायुतीने महाराष्ट्राला धोका दिला असल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सपत्नीक गुरुवार दि.२८ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथील साई मंदिरात साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

याप्रसंगी शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचीन चौगुले यांनी त्यांचा सत्कार केला. साई दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सध्याची भाजपाची राजकारणातली जी कार्यपद्धती व बनवाबनवी आहे.

त्यातून स्पष्टपणे दिसते की, आगामी राजकारणात २०२९ मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही विरोधी पक्षात दिसतील किंवा राजकारणातच नसतील.

त्यांचा पक्ष गुंडाळलेला असेल किंवा शिल्लक राहिला तर त्यांना सतेत्त स्थान राहणार नाही. भाजपा लाडक्या बहिणींच्या अडून ईव्हीएमचा गेम करतय असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. २०२९ मध्ये शिंदे आणि पवार हे राजकीयदृष्ट्‌यासत्तेच्या बाहेर फेकले जातील आणि राजकीयदृष्ट्या संपलेले तुम्हाला दिसतील.

भारतीय जनता पक्ष या दोघांनाही संपवल्याशिवाय राहणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले. याप्रसंगी शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचीन चौगुले तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.