Ahilyanagar News
Ahilyanagar News

Ahilyanagar News : भाजपाची पांरपरिक मते, डॉ. सुजय विखे व आमदार मोनिकाताई राजळे यांनी केलेली विकासाची कामे, विखे घराण्याचे गेल्या पन्नास वर्षात सामाजिक कार्यात असलेले योगदान, यामुळे मतदारांनी केलेले सहकार्य,

यामुळे डॉ. सुजय विखे यांना पाथर्डी तालुक्यातून चांगले मताधिक्य मिळेल, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. तर तालुक्यात असलेला व्यक्तिगत जनसंपर्क, कोव्हीड काळात केलेले कार्य, राष्ट्रीय महामार्गासाठी केलेले उपोषण व सामान्य माणसाला सहज उपलब्ध होणारा माणूस,

अशी प्रतिमा असलेले निलेश लंके यांचाच विजय निश्चित, असा त्यांच्या समर्थकांनी विश्वासपूर्वक केलेला दावा, यामुळे कोण विजयी होणार, याची उत्सुकता वाढली आहे. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये पैंजा लागल्या आहेत.

पाथर्डीतील एका भाजपाच्या युवा कार्यकर्त्याने विखे निवडून येतील अन्यथा मी मिशा काढील, अशी पैंज राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यासोबत लावली आहे. पाथर्डीतील पंकजा मुंडे समर्थकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.

पंकजा मुंडे यांच्याबद्दल भाषणात सहानुभुती व्यक्त करायची आणि त्यावर मताची पोळी भाजून घ्यायची. प्रत्यक्षात पंकजा मुंडे यांना बीडमध्ये झालेला खरा त्रास कोणामुळे आहे? त्यांचा केलेला गावागांतील अपमान कोणाच्या सांगण्यावरुन केला गेला, मग कोरडी सहानुभुती का दाखविता, असे भाजपाचे कार्यकर्ते म्हणतात.

तुम्हीच मुंडे यांच्या नावाने मते मागता. नंतर मुंडे यांच्या समर्थकांना पदापासून बाजुला ठेवता. तुमच्या मर्जीतील व्यक्तींना लाभाची पदे देता. मुंडे यांच्या नावाचा फायदा घेता, पण मुंडेंच्या समर्थकांना उमेदवाऱ्यासुद्धा देत नाहीत, मूळ भाजापाला कात्रजचा घाट दाखवता, असा दावा शरद पवार गटातील प्रमुख कार्यकर्त्यांनी केला आहे.

भाजपाने डॉ. सुजय विखे यांना विजयी करण्यासाठी तालुक्यात सुरुवातीपासूनच कंबर कसली होती. पंचायत समिती गणनिहाय मेळावे,

महिला बचत गटाच्या सदस्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे. आमदार मोनिकाताई राजळे व खासदार डॉ. सुजय विखे यांनी केलेली विकासाची कामे, यावर मतदारांशी संवाद साधला. विखेंना पुन्हा विजयी करावे.

नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मते द्यावीत, असे त्यांचे समर्थक सांगत होते. आमदार राजळे, शालिनीताई विखे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मतदारांशी संवाद साधला.

लोकनेत्या पंकजा मुंडे यांची पाथर्डीत झालेली सभा, यामुळे भाजपाचा मतदानाचा टक्का वाढेल, असा दावा भाजपावाले करीत आहेत. सामान्य माणूस व सहज उपलब्ध होणारा व्यक्ती म्हणून मला खासदार करा, अशी साद निलेश लंके यांनी मतदारांना घातली होती. जरांगे यांच्या आंदोलनामुळे सरकारच्या विरोधात वातावरण तयार झालेले होते.

भाजपाला पाडा, मग कोणालाही मते द्या, असा सुर मराठा आंदोलकांमध्ये होता. त्याचा परिणाम काय होतो, यावर लंकेंचा विजय अवलंबून आहे. अॅड. प्रतापराव ढाकणे यांचा तालुक्यात असलेला दांडगा जनसंपर्क, राष्ट्रवादी शरद पवार यांच्याबद्दल असेलली सहानुभुती व चिडलेले मराठा आंदोलक, यामुळे लक हे विजयाचे शिल्पकार ठरतील, असे त्यांचे समर्थ बोलत आहेत.

कोव्हीड काळात जनतेला दिलेला विश्वास, राष्ट्रीय महामार्गावर झालेले अपघात व ते काम पूर्ण करण्यासाठी आमदार लंके यांनी केलेले उपोषण, यामुळे लोकांचा लंके यांच्यावरील असलेला विश्वास अधिक वाढला होता.

जनतेने व सोशल मीडियावरील युवकांनी आमदार निलेश लंके यांच्याबद्दल व्यक्त केलेली सहानुभुती मतदानामध्ये किती प्रमाणात उतरली.

शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारी जनता व अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी घराघरांत केलेला मोठा संपर्क, यामुळे तुतारी वाजणार, असा महाविकास आघाडीचा वाढलेला विश्वास, किती खरा ठरतो, हे ४ जूनलाच कळेल.

नरेंद्र मोदींचा करिष्मा, राम मंदिराची उभारणी, भाजपाची पांरपरिक मते, विखे- राजळे यांनी केलेली विकासाची कामे, पंकजा मुंडे यांचा पाठिंबा, आणि महात्वाची असलेली विखे यंत्रणा,

यामुळे कमळच फुलणार, असे भाजपावाले ठामपणे सांगत आहेत. आता विजयाबाबत दोन्ही बाजूंकडून झालेले दाव-प्रतिदावे चर्चेचा विषय आहेत. तुतारी वाजेल, की कमळ फुलेल, ही चर्चा ४ जूनलाच थांबेल.