Ahilyanagar News : राम शिंदे सर तुम्ही म्हटलं होतं की, अजित पवारांनी माझ्या इथे सभा घेतली नाही. त्यामुळे आपला पराभव झाला. मात्र, जे झाले ते चांगलेच झालं, आपण आज सभापती झाला आहात.
कदाचित आपण निवडून आला असता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असे वाटले असते तर गिरीश महाजनांचे मंत्रिपद गेले असते. मात्र आता हे सर्व जाऊद्या, आज तुम्ही विधिमंडळात सर्वोच्च स्थानी आहात, अशी फटकेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्या लढत झाली होती. या लढतीत रोहित पवार यांचा केवळ १२४३ मतांनी विजय झाला होता.
त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी रोहित पवार यांना अजित पवारांनी माझी सभा झाली नाही, म्हणून वाचलास, असे म्हटले होते. यावरून राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता.
कर्जत- जामखेड मतदारसंघात युतीचा धर्म पाळला गेला नाही. माझा बळी दिला गेला. पवार कुटुंबात अघोषित करार झाला होता, असे त्यांनी म्हटले आहे. आता यावरून अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.
राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी, यासंबंधीचा प्रस्ताव आज श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषद सभागृहात मांडला. या प्रस्तावाला विधान परिषदेच्या सदस्य मनीषा कायंदे तसेच अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यानंतर अजित पवारांनी केलेल्या भाषणाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.ते म्हणाले, विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याबद्दल सांगितले. मात्र आपण अजूनही चाळीशीत आहात, असेच वाटत आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सभापती राम शिंदे यांचे अभिनंदन करत होते. त्यावेळी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी काहीतरी वक्तव्य केले. यानंतर गिरीश आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, असे टोला अजित पवारांनी गिरीश महाजनांना लगावला. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर विधानपरिषदेत एकच हशा पिकल्याचे दिसून आले.