Ahilyanagar news : शेतजमिनीचा बांध कोरल्याच्या कारणावरून पुतण्याने चुलत्यास मारहाण करून थेट खून करण्यात आल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पुतण्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी नेवासा तालुक्यातील वांजोळी येथील खंडागळे यांच्यात हे वाद झाले. यात पोपट खंडागळे याने त्याचे चुलते असलेले गवाजी रामकृष्ण ऊर्फ रामकिसन खंडागळे यांना मारहाण केली यात त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून त्यांचा खून केला. हि घटना सोमवारी (दि. १६) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वांजोळी परिसरातील दाणी वस्ती येथे ही घटना घडली.

याबाबत मृत गवाजी खंडागळे यांचा मुलगा दत्तात्रय गवाजी खंडागळे यांच्या फिर्यादीवरून पोपट ऊर्फ पप्पू भिकाजी खंडागळे याच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात दत्तात्रय खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की भुईमुगाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेलो असता, वडील गवाजी रामकृष्ण ऊर्फ रामकिसन खंडागळे (वय ५४) यांना आरोपीने बांध का कोरला, असे म्हणून शिवीगाळ करून लोखंडी पाईपने डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारून जीवे ठार मारले.

या फिर्यादीवरून पोपट खंडागळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला सोनई पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक सुरज मेढे करीत आहेत.

घटनेची माहिती मिळताच शेवगाव उपविभाग पोलीस अधिकारी सुनील पाटील व सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दरम्यान शेतीच्या वादातून अनेकदा वादाच्या घटना घडत आहेत त्यामुळे याबाबत वेळीच ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.