Ahilyanagar News : भाळवणी व परिसरातील वनविभागाच्या हद्दीमध्ये असलेल्या हरीण, रानडुकरे, ससे, मोर, घोरपड या वन्य प्राण्यांवर शिकाऱ्यांची वक्रदृष्टी पडली असून गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात या वन्य प्राण्यांची तस्करी करण्यात येत आहे. वन विभाग तसेच पोलिसांनी या तस्करीला आळा घालण्यासाची मागणी करण्यात येत आहे .
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार वन्य प्राण्यांची तस्करी करण्यासाठी नगर, पुण्याहून काही लोक पारनेर तालुक्याच्या वन विभागाच्या हद्दीमध्ये येऊन बेकायदेशीरपणे प्रवेश करून वन्य प्राण्यांची तस्करी करतात, असे प्रकार वारंवार घडूनही वन विभाग त्याकडे डोळेझाक करते.
वास्तविक राखीव वनांमध्ये प्रवेश करण्यासाठी बंदी असताना तस्कर बिनदिक्तपणे या क्षेत्रात प्रवेश करून शिकार करतात, हे रोखण्यासाठी हत्यारबंद वन पोलिसांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना राखीव वन क्षेत्रात फिरणारे तस्कर आढळले तरी ते कारवाई करत नाहीत. एखाद्या वन्य प्राण्याची शिकार केल्याचे आढळून आले तरच कारवाई केली जाते.
पारनेर तालुक्यात वन क्षेत्र जास्त असल्याने पारनेर व टाकळी ढोकेश्वर या दोन विभागांत विभागणी करण्यात आलेली आहे. दोन्ही विभागासाठी प्रत्येकी एक रेंजर व स्टाफ नियुक्त आहे. अपुरा स्टाफ आणि कारवाईबाबत अनास्था यामुळे वन्य जीवांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते आहे.
तालुक्याच्या संरक्षित वनातून रान डुकरे, हरणांची शिकार केल्यानंतर त्याच्या मांस शौकीनांसाठी तालुक्यातच त्याची विक्री करण्यात येत असल्याची धक्कादायक माहीतीही पुढे आली आहे.