Ahilyanagar News : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी करत विजय मिळवला. त्या निवडणुकीत सर्व पक्षाच्या नेत्यांनी तांबे यांना मदत केल्याची चर्चा झाली. अपक्ष निवडून आल्यावर सत्यजीत तांबे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र त्यांनी कोणत्याही पक्षाला खुले समर्थन केले नाही.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांच्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले जात आहे.
या निवडणुकीत संगमनेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा देखील धक्कादायक पराभव झाला. पराभवानंतर त्यांनी तालुक्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा घेत कार्यकर्त्यांचे सांत्वन केले. तसेच या पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागण्याचा सल्ला देखील दिला.
दरम्यान या कार्यक्रमासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार तथा बाळासाहेबांचे भाचे सत्यजीत तांबे मंचावर उपस्थित होते.
आमदार तांबे यांच्या उपस्थितिने सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या, मात्र याबाबत फारसे कोणी बोलून दाखवले नाही त्यामुळे आता मागील झाले गेले सर्व विसरून गेले आहेत असे चित्र असतानाच काल राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे सत्यजीत तांबे यांनी एक्स हॅण्डलवर पोस्ट करत कौतुक केल्याने राजकीय विश्लेषक देखील चक्रावून गेले आहेत.
कारण तांबे कधी थोरात यांच्या मंचावर असतात तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांचे कौतुक देखील करतात त्यामुळे तांबे यांच्या या कृतीने सत्यजीत तांबेंच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय? असाच प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहेत.
एकीकडे माजी आमदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर आहे. मात्र त्यांचे सख्खे भाचे असलेले सत्यजीत तांबे भाजप नेत्यांचे कौतुक करत असल्याने मामा भाचे यांच्यात अंतर्गत विवाद काही सुरू आहे का? आगामी काळात सत्यजित तांबे भाजपचे कमळ हातात घेणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत ठोस उत्तर आगामी काळात मिळेल अशी अपेक्षा आहे.
काय आहे तांबे यांच्या ‘त्या’ पोस्टमध्ये
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांची पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना मी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. २०१४ ते २०२४ या दशकात विविध भूमिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी त्यांनी घेतलेले निर्णय पाहता माझ्या शुभेच्छा योग्य ठरल्या याचा आनंद आहे. मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला याकाळात त्यांनी
– समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड
– जलयुक्त शिवार योजना, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प
– सारथी / बार्टी/ टार्टी / अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांसारख्या संस्थांची निर्मिती
– १ रुपयात पीक विमा, मागेल त्याला सौर पंप
– महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढविणे अशी कामे केली आहेत .