Ahilyanagar News : सरकारी कार्यालयात अनेकदा कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांशी हुज्जत घालत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. मात्र आता चक्क अर्धनग्न अवस्थेत कार्यालयात गोंधळ घालत अधिकाऱ्याला शिवीगाळ करून मुला बाळांना संपवून टाकण्याची धमकी दिली आहे.
संगमनेर नगरपालिकेत वायरमन म्हणून काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याने दारूच्या धुंदीमध्ये अर्धनग्न अवस्थेमध्ये पालिका कार्यालयात गोंधळ घातल्यामुळे पालिका प्रशासनाने या कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सदर कर्मचाऱ्याने गोंधळ घातल्याच्या घटनेच्या निषेधार्थ भाजपने पालिका कार्यालयासमोर नुकतेच ठिय्या आंदोलन करून या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपरिषदेमध्ये वायरमन म्हणून काम करत असलेल्या कर्मचाऱ्याने हा गोंधळ घातला आहे. या कर्मचाऱ्याने यापूर्वीही पालिका कार्यालयात गोंधळ घातलेला आहे. शुक्रवारी (दि.२३) दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान, या कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला.
त्याने नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून मुला बाळांना संपवून टाकण्याची धमकी दिली. हा गोंधळ सुरू असताना पालिका कार्यालयमध्ये लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी व अन्य कामांसाठी अनेक महिला आल्या होत्या.
महिलांनी हा गोंधळ पाहिल्यानंतर याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मुख्याधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान या घटनेची माहिती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून या घटनेचा निषेध केला.
त्यामुळे सदर कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अमोल खताळ यांनी केली. याप्रसंगी महिला ओबीसी आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कांचन ढोरे, महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.