Ahilyanagar news : विवाह म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं एकत्र राहणं नाही, तर त्या दोन व्यक्तींनी आपापसात खुलेपणाने संवाद साधणं आहे. विचार, भावना, आणि समस्यांवर मोकळेपणाने बोललं गेलं, तरच नातं बहरतं. संवादाचा अभाव हा अनेकदा लग्नातील समस्यांचं मूळ ठरतो.
विवाह ही परंपरेने केवळ एक कर्तव्य म्हणून पाहिली जाणारी संस्था नाही; ती दोन व्यक्तींमधील नात्याचा गाभा आहे, जिथे संवाद, सामंजस्य, आणि समर्पणाचा मोठा वाटा असतो. बदलत्या काळात, विवाहाच्या परंपरागत व्याख्या आणि अपेक्षा हळूहळू बदलत आहेत. यामुळे ही संस्था अधिक लवचिक आणि व्यक्तिनिष्ठ बनण्याची गरज निर्माण झाली आहे.
बदलत्या समाजात संवादाच्या सवयी वाढवणं. मात्र सध्या आर्थिक अस्थिरता, स्त्री- पुरुष प्रमाणातील असमतोल, करिअरला प्राधान्य आणि जोडीदाराबद्दलच्या वाढत्या अपेक्षांमुळे विवाहाचा निर्णय सतत पुढे ढकलला जातोय. समाजाचा दबाव आणि व्यक्तिगत स्वप्नांची ओढ, यामध्ये तरुणाई अडकून गेली आहे. अशा परिस्थितीत लग्नाचा मुहूर्त ठरवणं एका कठीण समीकरणासारखं बनलं आहे.
लग्नानंतरचा खर्च आपण कसा हाताळणार? हा प्रश्न अनेक तरुणांना सतावतो. महागाईने गगनाला भिडलेले घरखर्च, लग्नसोहळ्यांची वाढती चैनी, आणि स्थिर नोकरीचा अभाव यामुळे विवाहाच्या विचारालाही अडथळा निर्माण होतो.
शहरी भागात तरुण-तरुणी आधी स्वतःचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी मोठा वेळ खर्च करत आहेत. ग्रामीण भागात कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमुळे मुला-मुलींच्या लग्नाची चर्चा लांबणीवर पडते.
गेल्या काही दशकांत झालेल्या खी भ्रूण हत्या आणि पुरुष मुलाला प्राधान्य देणाऱ्या प्रवृत्तीमुळे आज स्त्रियांची संख्या लक्षणीय घटली आहे. काही ठिकाणी १००० पुरुषांमागे फक्त ८५० स्त्रिया आहेत. परिणामी, अनेक पुरुषांना विवाहासाठी योग्य जोडीदार सापडणे कठीण झाले आहे.
आधुनिक काळात जोडीदाराच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत. त्याला / तिला नोकरी असावी, परदेशी शिक्षण घेतलेलं असावं, चांगल्या कुटुंबातील स्थळ असावं, या अपेक्षा तरुणाईमध्ये सर्वसामान्य झाल्या आहेत. अपेक्षा जुळत नसल्यामुळे विवाहाच्या चर्चा निष्फळ ठरत आहेत.
शिक्षणासाठी लागणारा वेळ आणि करिअरमध्ये स्थिर होण्यासाठी लागणाऱ्या संघर्षांमुळे विवाहाचा निर्णय लांबत आहे. आधी स्वतःला सिद्ध करायचं, मग लग्नाचा विचार, असं आजच्या पिढीचं सरळ धोरण आहे. विशेषतः महिलांमध्ये करिअरबाबत जागरूकता वाढल्याने विवाह उशिरा होत असल्याचं दिसून येत आहे .