अहिल्यानगर पोलीस दलामार्फत नागरिकांना अर्जंट मदत मिळावी यासाठी डायल ११२ हि सेवा सुरु केली आहे.कोपरगावातील एका व्यक्तीने कॉल करून खुन झाल्याची माहिती दिलयामुळे पोलिसांची धावपळ उडाली.

पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी केल्यावर डायल ११२ वरून मिळालेली खुनाची बातमी खोटी असल्याचे आढळून आले.

त्यामुळे पोलिसांनी कॉल करून खोटी बातमी देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे पोलिसांनी युवकावर गुन्हा नोंदवला आहे.परशुराम रावसाहेब दिवे (वय ३१, रा. हनुमाननगर, कोपरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

या घटनेबाबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी कि,कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे डायल ११२ चे एमडीटी मशिनवर मंगळवारी (दि.२६) सायंकाळी ६.२८ वाजता कॉल आला की, हनुमाननगर गेट कोपरगांव या ठिकाणी माझ्या भावाचा काल खुन झाला असुन, त्याचा मृतदेह सापडत नाही त्यामुळे तात्काळ पोलीस मदत पाठवा.

असा कॉल आल्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तात्काळ स.पो.नि. आशिष शेळके, पो.कॉ. धोंगडे, पो.कॉ साळुंखे यांना सदर ठिकाणी खात्री करण्यासाठी पाठवले.त्यांनी त्या ठिकाणी जावुन कॉल करणाऱ्याला व्यक्तीला संपर्क केल्यावर त्याने पोलीसांना काही एक प्रतिसाद दिला नाही.

त्यामुळे पोलीसांनी तेथील स्थानिकांकडे विचारपुस केल्यावर त्यांना कळले कि या ठिकाणी कोणताही खुन झालेला नाही.त्यानंतर पोलिसांनी कॉल करणाऱ्याला व्यक्तीला वारंवार संपर्क करून त्याची भेट घेत त्याचे नाव विचारल्यावर त्याने परशुराम दिवे असल्याचे सांगितले.

तेव्हा त्याला घटनेबाबत सविस्तर विचारपुस केल्यावर असता त्याने सांगितले की, त्याचा मोठा सावत्र भाऊ संतोष आडांगळे याचा पहाटे ३ वाजता खुन झालेला आहे आणि त्याचा मृतदेह हा तेथेच राहणारा माउ पवार याने गोणीत घालुन घेवुन जातांना मी पाहिले आहे,असे त्याने सांगितले.

त्यामुळे पोलीसांनी त्याच्या पत्नी कडे विचारपुस केल्यावर त्यांनी संतोष आडांगळे याचा मोबाईल नंबर दिला आणि पोलीसांनी त्या नंबरवर संपर्क केल्यावर त्याने सांगितले की, मी जिवंत असुन सुस्थितीत आहे.

त्यामुळे पोलीसांना समजले की, परशराम दिवे याने खुनाची घटना घडलेली नसतांना पोलीसांना त्रास व्हावा या खोडसाळ वृत्तीने डायल ११२ यावर कॉल करुन खोटी माहिती दिली आहे.म्हणुन आरोपी परशराम दिवे याच्या विरुध्द कोपरगांव शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

महाराष्ट्र पोलीस दलामार्फत डायल ११२ ही सुविधा अत्यावश्यक सेवा म्हणून नागरीकांना वेळे प्रसंगी तात्काळ मदत मिळवी म्हणून सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे नागरीकांनी डायल ११२ वर खरोखरच मदतीची गरज असेल तरच पोलीस मदतीसाठी कॉल करावा.

उगीचच खोटे कॉल करुन प्रशासनाची दिशाभूल व फसवणूक करु नये.डायल ११२ ला कॉल करुन खोटी माहीती दिल्यावर संबंधित इसमावर पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल,असा इशारा नियंत्रण कक्ष येथील डायल ११२ युनिटचे पोलीस उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांनी दिला आहे.