शहरासह उपनगरात सामान्यांना धमकावून भूखंडावर ताबा मिळविण्याचे प्रकार सुरूच आहेत.मागील आठ दिवसांत एमआयडीसी आणि कोतवाली पोलिस ठाण्यात ताबे मारीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.यापूर्वीही मोक्याचे भूखंड बळकावल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
भीतीपोटी अनेकजण तक्रार न देता कमी भावात प्लॉट विकून टाकत असल्याचेही अनेक प्रकार घडत आहेत.त्यामुळे सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.शहरासह उपनगरांत मोक्याच्या जागांवर बेकायदेशीर ताबा मारण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.
मागील आठवड्यात कोतवाली व एमआयडीसी पोलिस ठाण्यात ताबा मारल्याचा प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे.लोकवस्ती वाढू लागल्याने जमिनीला सोन्याचा भाव आले आहेत.शहरातील तपोवन रोड, भिस्तबाग महाल, पुणे रोड, कल्याण रोड, सोलापूर रोड परिसरात व्यापारी संकुल उभे राहत आहे.
मोठे भूखंड शोधून सापडत नाहीत.मोठ्या प्रकल्पांसाठी बांधकाम व्यावसायिक जागेच्या शोधात असतात.त्यासाठी ते पैसे मोजायलाही तयार असतात.पण जागा मिळत नाही.याचा फायदा एजंट उचलतात.मोकळे भूखंड शोधून त्यावर ताबा मारला जातो.
सुरुवातीला काही लोकांना हाताशी धरून अतिक्रमण करण्यात येते.अशावेळी जागा मालक जागा वाचविण्याचा प्रयत्न करतात.परंतु, त्यांनाही कागदपत्रांची भीती दाखविली जाते.काही प्रकरणांत विरोधक न्यायालयात धाव घेतात.प्रकरण न्यायायायलात गेल्यास निर्णय होईपर्यंत जागा विकसित करता येत नाही.
अशा अनेक जागा विना वापर पडून आहेत.वादग्रस्त भूखंड कमी भावात खरेदी करून चढ्या भावाने विक्री केली जाते. सावेडी उपनगरात एका राजकीय पक्षाच्या युवा नेत्याने मोक्याच्या भूखंडावर ताबा मारत कमी भावात खरेदी केला.त्यात त्याने लाखो रुपये कमविले.
एकही रुपयाची गुंतवणूक न करता लाखो रुपये कमविणाऱ्या एजंटाच्या टोळ्याच शहरात सक्रिय आहेत.विशेष म्हणजे हे सर्व कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असतात.त्यामुळे त्यांच्याशी कुणी वाद घालण्याचे धाडस दाखवित नाही. भीतीपोटी कमी भावात नागरिक भूखंड विकून टाकतात.
त्यामुळे एजंटांचे त्यात भागून जाते.आयुष्यभर कमावलेले पैसे अनेकजण जमिनीत गुंतवतात.परंतु, भूखंड सुरक्षित राहतो की नाही,याची शाश्वती नाही.त्यामुळे शहर व परिसरात भूखंड मालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कल्याण रोडवर मध्यंतरी पुणे येथील एका टोळीने ताबा मारला.भूखंडावर असलेले पत्रे काढून सपाटीकरण करण्यात आले. संबंधित जागा मालक बाहेर गावी होता.त्यांना समजल्यानंतर ते नगरला आले.त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने संरक्षण दिल्याने भूखंड वाचला.
भूखंडावरील ताबेमारीत राजकीय नेत्यांच्या पंटरांचाच हात असतो.प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी हजर राहत नसले तरी प्रकरण पोलिस ठाण्यात गेल्यानंतर आवर्जून उपस्थित असतात.काही प्रकरणांत मंत्रीही फोन करतात.
अशावेळी पोलिस बोटचेपी भूमिका घेतात.दोघांपैकी पोलिसांनी कुणाला मदत करायची हे देखील राजकीय पुढारी ठरवितात.त्यामुळे जागा मालकाला न्याय मिळेलच,असे नाही.त्यामुळे अहिल्यानगरमध्ये सध्या अश्या एजन्ट मुळे मुळशी पॅटर्न वाढतोय.