शाळा, कॉलेजातील मुला-मुलींमध्ये थोडं काही बिनसले की सोशल मीडियावर बदनामी करून सूड घेतला जातो.प्रेमी युगुलही त्याला अपवाद नाहीत.काहीही झाले तरी ती पुन्हा बदलणार नाही आणि बदलली तरी काहीच करू शकणार नाही, यासाठी चोरी छुपे तिचे नग्न फोटो मोबाइलमध्ये काढून ठेवतात.

दोघांत काही बिघडले किंवा तिने नकार दिला तर हेच नग्न फोटो हत्यार म्हणून वापरले जात असल्याची एक घटना नुकतीच समोर आली आहे.परंतु,मुलीनेही त्याच्या या धमकीला भीक न घालता त्याला जेलची हवा खायला पाठविले आहे.८ डिसेंबरला तोफखाना पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

अशीच हिंमत इतर मुलींनीही दाखवावी,असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.गावात उच्च शिक्षणाची सोय नव्हती म्हणून मुलगी मोठ्या बहिणीसोबत शिक्षणासाठी नगर शहरात आली.दोघी रूमवर राहू लागल्या.दोघींचे शिक्षण सुरू होते. एके दिवशी तिची गावातीलच मुलाशी ओळख झाली.

ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर तो चोरून तिला भेटण्यास रूमवर यायचा.दोघांचे प्रेम बहरत गेले.तो तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करू लागला.तिने नकार दिला.पण तरीही त्याने तिच्याशी जवळीक साधत शारीरिक संबंध ठेवले. दोघांचे भेटणे सुरू होते.

त्याने नकळत तिचे नग्न फोटो आपल्या मोबाइलमध्ये काढून ठेवले.त्याने त्याच्या एका मित्राची तिच्याशी ओळख करून दिली आणि तिथेच घात झाला.त्याने मुलगा दुसऱ्या मुलीसोबत फिरत असल्याचे तिला सांगितले.यावरून त्यांच्यात भांडण झाले.

दोघांत टोकाचा वाद झाल्याने भेटणे तर दूरच,पण बोलणे ही बंद झाले.दररोज भेटणारी मुलगी आता त्याच्यापासून दुरावली होती.त्यामुळे मुलाने व त्याच्या मित्राचा सूड घ्यायचे ठरविले.तो दोघांनाही त्रास देऊ लागला.मुलगा मुलीला त्रास देतो,हे मुलीच्या वडिलांनाही समजले.

त्यांनी मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला.पण मुलाने ऐकले नाही. त्याने त्याचे कारस्थान सुरूच ठेवले.दरम्यान मुलीचा नगरमधील एका कॉलेजला नंबर लागला. ती दोन वर्षांनी पुन्हा नगरमध्ये राहावयास आली.पण ती आता त्याच्यासोबत नाही, तर त्याच्या मित्रासोबत फिरू लागली.त्याचा त्याला राग आला.

तो एके दिवशी ती राहत असलेल्या रूमवर आला.त्याने तिला त्याच्या मोबाइलमधील तिचे नग्न फोटो दाखविले.ते फोटो पाहून ती घाबरली.तू जर माझ्याशी संबंध ठेवले नाही, तर हे फोटो मी व्हायरल करीन,अशी धमकी त्याने तिला दिली.

पण,त्याच्या धमकीला तिने भीक घातली नाही.ती तयार होत नाही, हे पाहून त्याने तिच्या वडिलांना मेसेज केले.एवढे करूनही तो थांबला नाही.त्याने त्याचा मित्र व तिचे या दोघांचे सोबत फिरतानाचे फोटो काढले व ते तीच्या वडिलांना पाठविले.

त्याच्या या कृत्याने ती संतापली.तिने थेट पोलिस ठाणे गाठले आणि त्याच्या गैरकृत्याचा पाढाच पोलिसांसमोर मांडला. पोलिसांनी दोन दिवसांत त्याला अटक करून पोलिस ठाण्यात हजर केले.त्याने तीची बदनामी केल्याची कबुली दिली.त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.