करंजी महावितरण कपंनी कार्यालया अंतर्गत टाकण्यात येणाऱ्या विजेच्या लाईनसाठी महामार्गावरील मोठमोठया झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असल्याच्या निषेधार्थ महावितरण कंपनी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा लोहसरचे माजी सरपंच अनिल गीते पाटील यांनी दिला आहे.

याबाबतची माहिती अशी की, करंजी महावितरण कपंनी कार्यालया अंतर्गत दहा बारा गावांत चोवीस तास सिंगल फेज वीज देण्यासाठी विजेचे खांब,विजेच्या तारा ट्रान्सफॉर्मर उभे करण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.

या कामावर महावितरणच्या प्रमुखांसह सार्वजनिक बांधकाम विभागानेही डोळे झाक करून या कंपनीला पाठीशी घालण्याचे काम केले आहे.या कामासाठी राज्य मार्गावर रस्त्याच्या पाच-दहा फुटांवरच लोखंडी पोल उभे करण्यात आले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियम धाब्यावर बसवत हे पोल रस्त्याच्या कडेला उभारण्यात आल्याने भविष्यात निश्चितपणे हे पोल अपघाताला कारण ठरणार असून,या कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक मोठमोठया झाडांची कत्तल,ठेकेदाराच्या कामगाराकंडून करण्यात आलेली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी झालेल्या अर्थपूर्ण संबंधामुळेच रस्त्याच्या कडेला नियम डावलून लाईटचे पोल उभारण्यात आले असल्याचा आरोप आदर्श गाव लोहसरचे माजी सरपंच अनिल गीते पाटील यांनी केला आहे.

वीज कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात दि. १० डिसेंबर रोजी करंजी येथे कल्याण-निर्मळ, राष्ट्रीय महामार्गावर परिसरातील ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा गीते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.