राहुरी तालुक्यातील वांबोरीच्या आठवडे बाजारात दोन संशयित महिला निदर्शनास आल्याने ‘गावात मुले पळविणारी टोळी आली’ ही अफवा उडाली.यावेळी काही सजग तरुणांनी संबंधित दोन महिलांची विचारपूस केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत,त्यामुळे या दोन महिलांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की,राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मोठा आठवड्याचा बाजार भरतो.गावात तसेच भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असते.बाजारातील याच गर्दीचा फायदा घेत अनेक वेळा मोबाईल चोरटे व पाकीट मारांनी आपला हात साफ केल्याच्या अनेक घटना या अगोदर घडल्या आहेत.
सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास वांबोरी गावातील खळवाडी व विठ्ठलवाडी परिसरातील गल्लींमध्ये दोन महिला संशयास्पद फिरताना आढळून आल्या.या महिला दरवाजा उघडा असलेल्या घरांमध्ये डोकावत असल्याचे वांबोरीतील काही सजग तरुणांच्या नजरेस आले.
त्यामुळे त्यांनी या महिलांकडे विचारपूस केली असता त्यांनी प्रथमतः उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे या तरुणांनी तत्काळ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील निकम यांना बोलावून घेतले.
निकम यांनी महिलांची विचारपूस करून चौकशीसाठी त्यांना वांबोरी पोलिस दुरक्षेत्रात आणले.त्यानंतर तपासाचा सोपस्कार करून त्यांना सोडून दिल्याचे सूत्राकडून समजते.दरम्यान, गावामध्ये मुलं धरणारी टोळी आल्याची चर्चा वाऱ्याच्या वेगाने पसरल्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांच्या चौकशीनंतर अशी कोणतीही टोळी नसल्याचे समोर आल्याने चर्चेवर पडदा पडला.वांबोरीत लहान मुले पळवणारी महिलांची टोळी आल्याचे समजतात अनेक महिलांनी आपले लहान मुल घरी एकटेच सोडून बाजारासाठी आल्या होत्या त्यांनी तत्काळ बाजार अर्ध्यावर सोडून आपल्या मुलांकडे घरी जाणे पसंत केले,तर अनेकांनी फोन करून आपल्या घरी मुलांविषय विचारपूस करून त्यांना घरातच ठेवण्याचा सल्ला दिला.