शिर्डी वरून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या (एम.एच. २० बी.एल. १८९३) क्रमांकाच्या एसटी बसने दुरूस्तीसाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली.त्यामुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये एसटी चालकासह नऊ प्रवासी जखमी झाले आहे.

नगर-मनमाड हायवेवर कोपरगाव शिवारात कातकडे पेट्रोल पंपासमोर काल रविवारी (दि. २२) दुपारी चार वाजता ही घटना घडली.या अपघातात चालकासह नऊ जण जखमी झाले आहे.त्यात एक महिला गंभीर जखमी आहे.या सर्वांना उपचारासाठी तातडीने रुग्णवाहिकेतून येथील एसजेएस रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,जखमी झालेल्यामध्ये सुनिता सचिन लुनवाल (रा. वैजापूर), सुमन कारभारी पठारे (रा. वैजापूर), आरती कारभारी पठारे (रा. वैजापूर), कल्याण किसन शहारे (रा. शिऊर बंगला), अशा विलास गायकवाड (शिवराई, ता. वैजापूर), आशाबाई रामदास रजपूत (रा. शिर्डी), शांताबाई भागवत इंगळे (रा. निमगाव),कांताबाई भागवत इंगळे (रा. निमगाव), मंदा दिलीप राजपूत (रा. शिर्डी), बसचे चालक के. बी. शेटे (रा. वैजापूर आगार) यांचा समावेश आहे.

एसटी बसच्या जोराच्या धडकेत पुढे चाललेला कंटेनर रस्त्याच्या खाली उतरला होता.कंटेनरवर एसटी बस पाठीमागून जाऊन जोरात आदळल्याने वाहकापासून ते चार क्रमांकाच्या सीटपर्यंत एसटी पूर्णपणे छतासह कापली गेली आहे.

दैव बलवत्तर होते म्हणून सर्व प्रवासी या अपघातातून बचावले आहे.जखमी प्रवाशांना पेट्रोल पंपावरील कर्मचारी मनसेचे सतीश काकडे, अजिंक्य काकडे, बापू काकडे यांच्यासह स्थानिक नागरीकांनी तातडीने धाव घेत या सर्वांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनास्थळी तातडीने कोपरगाव आगाराचे आगार प्रमुख अमोल बनकर, वाहतूक पर्यवेक्षक गिरीश खेमनर, वाहतूक निरीक्षक अमित हमपे, वरिष्ठ लिपिक औदुंबर श्रीगादी व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दाखल झाले होते.

अपघातानंतर पुढे चाललेला कंटेनर घटनास्थळावरून पसार झाला आहे.अपघातात आशाबाई विलास गायकवाड या महिलेचा हात फॅक्चर झालेला आहे.याबाबत मात्र पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

दरम्यान,या अपघातामधील जखमी झालेल्या नऊ प्रवाशांना तातडीने एसटी प्रशासनाच्या वतीने आर्थिक मदत म्हणून एक हजाराची मदत दिली आहे,अशी माहिती आगार प्रमुख अमोल बनकर यांनी दिली आहे.