राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड महामार्गावरील वांबोरी फाटा येथे रात्रीच्या सुमारास पोलीस गस्त घालीत असताना पाच जण दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांना निदर्शनास आले.यापैकी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, दि. २१ डिसेंबर रोजीच्या रात्री पाऊणच्या सुमारास नगर मनमाड महा मार्गावरील वांबोरी फाटा शिवारात राहुरीचे पोलीस कर्मचारी अंकुश भोसले व खेडकर यांचे पथक शासकीय वाहनाने रात्री गस्त घालत असताना वांबोरी फाटा येथे एका चारचाकी वाहनाच्या बाजूला पाच इसम संशयास्पद रितीने हालचाल करत असल्याचे दिसून आले.
गस्तीवरील पोलीस पथक त्यांना हटकण्यासाठी गेले असता सदर पाचही इसम सैरभैर होऊन त्यापैकी दोघे नजीकच्या शेतात पळाले व तिघे चारचाकी वाहनात बसू लागल्याने त्यांना गस्तीवरील पथकातील पोलिसांनी तात्काळ समय सूचकता दाखवत चारचाकीसह ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात आणले.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता हे पाचही आरोपी दरोड्याच्या तयारीने आलेले असल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींनी दिली.पोलीस हवालदार जानकीराम खेमनर यांनी आरोपींच्या ताब्यातील चारचाकी वाहन पंचांसमक्ष तपासणी केल्यावर दरोड्याच्या तयारीस लागणारे साहित्य मिळून आल्याने खात्री झाली.
याबाबत राहूरी पोलीस ठाण्यात अंकुश राहुर भोसले यांच्या फिर्यादीवरून ताब्यात घेतलेले किशोर अर्जुन बर्डे, सुनील संजय निकम, अंबादास एकनाथ पवार सर्व रा. पाण्याची टाकी, विळद, ता. नगर व इतरांवर गु.र.नं. १२९९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४),३१० (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे व पो.कॉ. इफ्तेखार सय्यद करत आहे.