श्रीरामपूर तालुक्यात सध्या दहशतीचे वातावरण वाढत असून तालुक्यात रोज मारामारीच्या घटना ऐकायला मिळत असून पोलीस स्टेशनमध्ये रोज राडा,मारामारी,दंगा,दमदाटीच्या केसेस नोंद होत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात दत्तनगर मधून मारामारीची घटना समोर आली आहे.शेजारच्या लहान मुलीने आपल्या अंगणातील झाडाचे पान तोडले म्हणून त्या मुलीच्या आई वडिलांना बेदम मारहाण करत दुखापत केली आहे.त्यामुळे शेजारच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला गेला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सुरेश विलास माघाडे हे घरासमोर उभे होते तेव्हा त्यांची लहान मुलगी आर्वी ही खेळताना शिवकुमार जाधव त्यांच्या घरासमोर गेली आणि त्याच्या अंगणात असलेल्या झाडाचे तिने पान तोडले म्हणून शिवकुमार जाधव यांनी सुरेश माघाडे यांना आवाज देवून मुलबाळ सांभाळता येत नाही का,असे म्हणुन शिवीगाळ केली.

तसेच स्वतःच्या मुलाला तुषार, साई व पत्नी संगिता यांना आवाज देऊन बाहेर बोलावले आणि सुरेशला शिवीगाळ करुन लोखंडी फायटर, लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली.त्यांचे भांडण सोडवायला गेलेल्या सुरेशच्या पत्नीला सुद्धा लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली.

संगिता शिवकुमार जाधव हीने सुरेशची पत्नी अर्चना हीचे केस पकडून परत जर तु आम्हाला काय म्हणाली तर तुला इथ राहणं मुश्किल करु आणि हातपाय तोडुन गळ्यात बांधु,अशी धमकी दिली.

या मारहाणीत सुरेश माघाडे व त्याची पत्नी अर्चना हे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर येथे दाखल केले आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात सुरेश माघाडे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी शिवकुमार जाधव, तुषार शिवकुमार जाधव, साई शिवकुमार जाधव, संगिता शिवकुमार जाधव या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.