राहुरी तालुक्यात मुळा व भंडारदरा धरणाचे विस्तीर्ण पात्र असल्याने वाळू तस्करांचे चांगलेच फावल्याचे चित्र आहे.महसूल प्रशासनाकडून वाळू वाहनांवर कारवाई करण्यात आखडता हात असल्याचे दिसून आले आहे.
केवळ ७ वाळू वाहणाऱ्या वाहनांवर कारवाई झाल्याने राहुरी महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकीला पाठबळ दिल्याच्या चर्चा झडत आहे.राहुरी परिसराला मुळा व प्रवरा (भंडारदरा धरण) नदी पात्राने वेढलेले आहे.
दोन्ही धरणांच्या पाण्याने समृद्ध झालेला राहुरी तालुक्याला सुजलामतेचा शिक्का प्राप्त झाला.राही परिसराला वरदान ठरलेल्या नदी पात्रांनाच शापीत करण्याचे पाप वाळूतस्करांकडून राजरोसपणे सुरूच आहे.
वरदान ठरलेले नदी पात्र शेतकर्यांचे आयुष्य उद्धव्स्त करण्यासाठी वाळू तस्करांची अवैध गौण खनिज वाहतूक मोहिम कारणीभूत ठरत आहे.राहुरी परिसरातील मुळा नदी पात्रातील बारागाव नांदूर, डिग्रस, राहुरी खुर्द, आरडगाव, तांदूळवाडी, कोंढवड, देसवंडी, शिलेगाव, वळण आदी पट्ट्यामध्ये अवैध वाळूउपसा जोमात सुरू आहे.
भंडारदरा धरणाच्या प्रवरा नदी पट्यातही हाच प्रकार घडत आहे.सोनगाव, सात्रळ, चिचोली, लाख, जातप परिसरातही रात्रीच्या वेळी शेकडो वाहने राहुरी परिसरातून वाळू वाहतूक करतात.इतकेच नव्हे तर याच नदी पात्राच्या परिसरातून नाशिक, पुणे परिसरातही वाळू वाहतूक केली जाते.
परंतू डोळ्यावर पट्टी बांधलेल्या राहुरी महसूल प्रशासनाला मुळा व भंडारदरा नदी पात्र अलबेल असल्याचे दिसत आहे. गेल्या ८ महिन्यामध्ये केवळ ७ वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर राहुरी महसूल प्रशासनाकडून कारवाई झालेली आहे.
राहुरी महसूल प्रशासनाचा कारभार सद्यस्थितीला तहसीलदार नामदेव पाटील हे पाहत आहे.मुळा व भंडारदरा नदी पात्राचे लचके तोडले जात असतानाही महसूल प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही.
दरम्यान,राहुरी महसूल प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालयातून जमिन व गौण खनिज महसूल उद्दिष्ट १३ कोटी ८५ लक्ष रुपये देण्यात आलेले आहे.महसूल प्रशासनाने ८ महिन्यात केवळ २८ टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे.
यामध्ये जमिन महसुलचे ३ कोटी ८५ लक्ष दिले असून त्यापैकी ४७ लक्ष ३९ हजार रुपये वसूल झालेले आहे.तसेच गौण खनिज वसुली १० कोटी दिलेली असून ३ कोटी ४३ लाख रुपये वसूल करण्यात राहुरी महसूल प्रशासनाला यश आले आहे.
यामध्ये बारागाव नांदूर येथील मुळा नदी पात्रातील शासकीय वाळू डेपो, तसेच लाख येथील प्रवरा पात्रातील शासकीय वाळू डेपोच्या वसुलीचे सहकार्य लाभले आहे.परंतू राजरोसपणे अवैध वाळू वाहतूक होत असतानाही महसूल प्रशासनाची मात्र बघ्याची भूमिका असल्याने अपेक्षित गौण खजिन दंडात्मक कारवाई झाली नसल्याने वसुलीच्या आकड्याला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे.
सरत्या वर्षामध्ये अपेक्षित कामगिरी न केलेल्या राहुरी महसूल प्रशासनापुढे आता जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात कारवाईला गती द्यावी लागणार आहे. तसेच वसुलीच्या आकड्यामध्ये असलेला कमी आकड्यात बदल करण्यासाठी वसुली मोहिम वाढवावी लागणार आहे.
राहुरी महसूल प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीनंतर वाळू तस्करांवर कारवाईसाठी पथक तैनात केल्याची माहिती देण्यात आली आहे.राहुरी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे.
वसुलीची आकडेवारी वाढविण्यासाठी प्रशासनाकडून बैठका सुरू आहे.लवकरच जमिन महसूल वसूल केला जाईल.तसेच अवैध वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी तैनात पथकाकडून कारवाई होणार असल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली.
अवैध वाळू तस्करीतून राहुरीत खून, हाणामारी, खंडणीचे प्रकार घडले आहे.जेव्हा जेव्हा वाळू तस्करांचे वर्चस्व वाढले तेव्हा तेव्हा राहुरी परिसराला गुन्हेगारीने वेढले आहे.या सर्व गुन्हेगारांचा बंदोबस्त होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.