नगर शहरातील व्यापाऱ्याला दुचाकीवर पाठलाग करीत ‘भाई का फोन आयेगा उठा ले’ असे म्हणत मोबाईलवर मेसेज करीत जिवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी व्यापारी किरण मोहनलाल रांका (वय ५६, रा. आदर्श कॉलनी, नगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

किरण रांका यांचे शहरातील जुना दाणे डबरा येथे दर्शन सेल्स नावाने बेकरी प्रॉडक्टचे दुकान आहे.त्यांनी फिर्यादीत म्हटले की,१४ डिसेंबर रोजी रात्री दुकान बंद करून दुचाकीवरून सर्जेपुरा चौक,अप्पू हत्ती चौक मार्गे घरी जात असताना अप्पू हत्ती चौकाजवळ मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी पाठलाग करून आवाज देत थांबविले.

एकाने ‘भाई का फोन आयेगा उठा लो’, असे म्हणत दोघे तेथून निघून गेले.त्यांच्या लोखंडी नळीसारखे काहीतरी होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १५ डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. ‘देख कल गोली नही चलाई, अगली बार सिधे ठोक देंगे’ आम्हाला हलक्यात घेऊ नको.

किरकोळ पैशांसाठी तू धोका पत्करणार नाहीस,हे आम्हाला माहीत आहे.आमच्या मुलांना जेलमध्ये टाकले तर पाहून घेऊ, कारण ते कधी ना कधी बाहेर येणारच आहेत.तू मात्र जिवाला मुकशील,असा धमकीचा मेसेज आला.

त्यानंतर त्याच मोबाईल नंबरवरुन त्यांना फोन आला त्यांनी फोन उचलल्यावर समोरची व्यक्ती म्हणाली, ‘मेसेज पढा क्या, भाई का फोन आयेगा उठाव’, असे फिर्यादीत म्हटले.तोफखाना पोलिस गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून मोबाईल नंबरवरून आरोपीचा शोध सुरु केला आहे.हि बातमी शहरात सगळीकडे पसरली असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.

त्यामुळं शहरातल्या वाढत्या गुंडाराजला आळा बसणार का ? पोलीस या संदर्भात गांभीर्याने पाऊले उचलतील का ? या बाबत नागरिकांमध्ये चर्चा चालू झाल्या आहेत.त्यामळे नागरिकांना विश्वासात घेऊन पोलिसांवरचा विश्वास मजबूत करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली पाहिजे.