आजच्या डिजिटल युगात सर्व गोष्टी डिजिटल होत असताना चलन सुद्धा डिजिटल झाले आहे.ऑनलाईन पेमेंट किंवा ऑनलाईन बँकिंगचा वापर करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.कोणताही छोटा मोठा व्यवहार करायचा असेल तर लोक या पेमेंट्स मेथड वापरतात.

परंतु अश्या प्रकारे कोणताही व्यवहार करायचा असेल तर काही सावधानता बाळगायला हवी नाहीतर थोड्याशा चुकीमुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.अशीच एक बातमी कोपरगाव मधून समोर येत आहे,ज्यात चेक रद्द झाल्यामुळे एकास शिक्षा झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,मका खरेदी केल्याच्या बदल्यात दिलेला धनादेश न वटल्याने आरोपीला ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा व १२ लाख रूपये नुकसान भरपाईची शिक्षा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महेश ए. शिलार यांनी ठोठावली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश प्रसाद (रा. विमाननगर, पुणे) यांनी गोल्डन वडर्स नावाने कुक्कुट पालन व्यवसाय सुरू केलेला आहे.

आरोपी सुरेश प्रसाद याने सुधाकर जामदार यांच्याकडून रक्कम १२ लाख ३६ हजार ८७८ रुपयांची मका उधारीवर खरेदी केली व त्याबदल्यात सुधाकर जामदार यांना त्या चेकवरून रक्कम मिळेल,असा विश्वास व भरोसा दिला.

परंतु सदरचा चेक आरोपीच्या खात्यावर अपूर्ण रक्कम असल्याने सदरचा चेक परत आल्याने फिर्यादी सुधाकर जामदार यांनी कोपरगाव येथील न्यायालयात फिर्याद दाखल केलेली होती.

त्याची चौकशी होवून आरोपीला वरील प्रमाणे शिक्षा झालेली आहे.या प्रकरणी फिर्यादी तर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अशोक दगडूजी टुपके यांनी फिर्याद दाखल करून कामकाज पाहिले. त्यांना सहकारी म्हणून अॅड. माधुरी काटे, अॅड. वर्षा उन्हाळे, अॅड. साक्षी अकोलकर व अॅड. सागर घुमे यांनी सहकार्य केले.