पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घ्या अन्यथा कुटुंबीयांना ठार मारू अशी धमकी देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी रोहन जयेंद्र चव्हाण, जितेंद्र सुरेश चव्हाण, सुनील जाधव यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे कि आमच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.या गुन्ह्यात पवन दीपक पवार व अन्य आरोपींना कलम ३०७ व इतर कलमांन्वये जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
शिक्षेविरोधात आरोपींनी खंडपीठात अपील दाखल केलेले असून,ते सध्या जामिनावर आहेत.ते आमच्या कुटुंबावर केसमध्ये तडजोड करण्यासाठी वारंवार दबाव आणत आहेत.नोव्हेंबर महिन्यात आमच्या आत्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली.
‘आमच्या विरोधात साक्ष देऊ नका,नाहीतर याचे परिणाम वाईट होतील’अशी धमकी दिली.आमच्या चुलत्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, १८ नोव्हेंबर २०२४ रोजी वारूळाचा मारूती कमानी जवळ मित्रांसोबत थांबलो असता पवन दीपक पवार, गणेश पवार यांच्यासह अन्य काही लोक तिथे आले.
‘तू जास्त शहाणा झाला आहेस का ? तुला व तुझ्या चुलत्याला केसेस मागे घ्या,असे बऱ्याच वेळा सांगितले.आठ दिवसांत गुन्हे मागे घेतले नाही तर ठार मारून टाकू,अशी धमकी दिली.
याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून,अद्यापि कोणतीही कारवाई झालेली नाही.यातील आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.