तालुक्यातील गाडकवाडी येथील एका २६ वर्षीय विवाहित तरुणाने राहात्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. २८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

रमेश भाऊसाहेब गांगड (वय २६, रा. गाडकवाडी (कुरणवस्ती), ता. राहुरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव असून याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत रमेश हा कुटुंबीयांसोबत वीट भट्टीच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलेला होता.तेथे तो कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी वीट भट्टीवर काम करत होता.मात्र त्यांचा व त्यांच्या पत्नीचा किरकोळ कारणावरून वाद झाला असल्याचे समजले.

त्यानंतर तो एकटा आपल्या मूळगावी गाडकवाडी (कुरणवस्ती) येथे आला.घरात कोणीही नसताना त्याने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.मयत रमेशचे वडील कामानिमित्त बाहेर गेलेले होते.

तर आई शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेली होती.शेळ्या चारून रात्री आठ वाजता आई घरी परतली व शेळ्या बांधण्यासाठी दोरी शोधण्यासाठी घरात गेली तर रमेश घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

त्यांनतर त्यांनी ताहाराबाद ग्रामपंचायतीचे उपसरपंच बापू जगताप यांना संपर्क करून संबंधित प्रकार सांगितला.त्यानंतर उपसरपंच बापू जगताप, संजय गांगड, शंकर गांगड, सचिन गागरे, भैय्या गागरे हे घटनास्थळी दाखल झाले व तात्काळ उपसरपंच बापू जगताप यांनी पोलिसांना सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर काही तासातच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस शेळकेंसह आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

मात्र उपचारापूर्वीच रमेश गांगड यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.त्यानुसार राहुरी पोलिसांनी अकस्मात गुन्ह्याची नोंद केली.मयत रमेश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा असा परिवार आहे.रमेश गांगड यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.