कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कृषीपंपाच्या चोरीच्या घटना थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. पोलीस प्रशासन चोरांचा बंदोबस्त कधी करणार, असा संतप्त सवाल नागरीकांमधून विचारला जात आहे.
सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांदा, मका, हरभरा, भाजीपाला व उसाच्या लागवडीसह जनावरांना चारा देखील लावलेला आहे.
विजेचे भारनियमन सुरू आहे,असे असताना कृषीपंप चोरीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहे. या चोरांना जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची भावना नागरीक व्यक्त करीत आहे.
रविवारी रात्री राघोबा दादा वाड्याजवळ डोखेंची नवीन आलेली मोटर पुन्हा चोरीला गेली.मागील काही दिवसांपूर्वीच त्यांची विद्युत मोटर चोरी गेली होती.
त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच आजूबाजूच्या राजू चंदनशिव, कुलदीप पवार, नयन पवार, दत्ता पवार यांच्या विद्युत मोटारी चोरी गेल्या होत्या.
त्यावेळी नेमके दिवसाची लाईट होती.त्यामुळे रात्री कोणी शेतात जात नाही. याच गोष्टीचा फायदा घेत आहे, असे पोलीस पंडीत पवार यांनी सांगितले.
विद्युत मोटारीच्या चोऱ्या, विजेचे भारनियमन अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला असताना या गंभीर समस्येकडे बघण्यास कुणालाही वेळ नाही,असे चित्र निर्माण झाले आहे.
विहिरीत पाणी उपलब्ध असताना पिकांना पाणी कसे द्यायचे याची चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे.ग्रामीण भागात शेती काम करण्यासाठी मजूर मिळायला तयार नाही.मजुरांचे वाढलेले भाव तसेच बियाणे, औषधे, खताचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे.
त्याबरोबरच शेती उत्पादनाला देखील फारसा भाव मिळत नाही, अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर आहे.गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याची देखील मोठ्या प्रमाणावर दहशत वाढलेली आहे.त्यामुळे रात्री-अपरात्री शेतकरी घराबाहेर पडण्यास धजावत नाही.
याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी या परिसरात आपले बस्तान बसवले असल्याचे दिसते. मागील काही दिवसांत पशुधनाच्या चोऱ्या देखील गावात झालेल्या आहे.
त्यामुळे पोलीस खात्याने चोरांचा त्वरित बंदोबस्त करून त्यांना जेरबंद करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.