खोटे दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेत चार व्यक्तींनी पाच टक्के दिव्यांग निधीचा लाभ घेतला असून यातील दोन व्यक्तींनी संजय गांधी निराधार योजनेचा देखील लाभ घेतला आहे. या प्रकरणी सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेत चार व्यक्तींनी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून दिव्यांगांसाठी दिल्या जात असलेल्या ५ टक्के निधीचा लाभ सन २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून घेतला आहे.या व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत जिल्हा रुग्णालयाकडे १९ ऑगस्ट २०२४ रोजी पडताळणी अर्ज करण्यात आला होता.

जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलेल्या पडताळणीत चारही व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची जिल्हा रुग्णालयाच्या दिव्यांग कार्यालयात नोंद आढळून आली नाही.तत्पूर्वी यातील एका लाभार्थ्याला ६ फेब्रुवारी २०२०, तर दुसऱ्या लाभार्थ्याला १ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मंजूर झाला आहे.

परंतु आता त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहे.तरीही बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ सुरूच आहे.राज्य सरकार, तसेच केंद्र सरकारकडून दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो.यात संजय गांधी निराधार योजनेचा देखील समावेश आहे.

या योजनेतून दर महिन्याला ठराविक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते.देवळाली प्रवरा येथील दोन्ही लाभार्थीनी दिव्यांग नसताना बनावट प्रमाणपत्र सादर करून दिव्यांगांच्या सवलतीचा लाभ घेतला आहे.

यामध्ये सरकारची तसेच दिव्यांगांची फसवणूक झाली आहे.वरील दोन्ही प्रकरणांत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून चौकशी करावी व दोषी व्यक्तींवर कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालय बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यामुळे चर्चेत आहे.दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या स्वावलंबन संकेतस्थळाचा गैरवापर करून बोगस प्रमाणपत्रे मिळविली आहेत.

याविरोधात जिल्हा रुग्णालयाने तक्रार दिल्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आता देवळाली प्रवरा येथील चार व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची नोंद जिल्हा रुग्णालयात आढळून येत नसल्याने जिल्हा रुग्णालय काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.