गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला म्हणून तरूणावर कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके व दगडाने मारहाण करण्यात आली.यावेळी दोन महिलांनाही मारहाण केल्याची घटना खांडके (ता. नगर) शिवारातील भगवान ठोंबे यांच्या घरी शुक्रवारी रात्री घडली.
किरण यमाजी चेमटे (वय ३० रा. खांडके) व चंद्रभागा अर्जुन ठोंबे (पत्ता नाही) हे दोघे जखमी झाले आहेत.जखमी किरण यांनी शनिवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत राजेंद्र ठोंबे, निखिल सुभाष ठोंबे, राजेंद्र महादेव ठोंबे, साहील सुभाष ठोंबे, गणेश सुभाष ठोंबे, गौतम रामदास ठोंबे (सर्व रा. खांडके) व एक पुणे येथील अनोळखी व्यक्ती यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.
संशयिताने शुक्रवारी रात्री चंद्रभागा ठोंबे यांच्या घरावर दगडफेक करून नुकसान केले.घरात घुसून चंद्रभागा यांना मारहाण केली.कविता ठोंबे यांना देखील मारहाण केली.त्यांनी मदतीसाठी किरण चेमटे यांना बोलून घेतले.
किरण तेथे येताच संशयित आरोपी त्यांना म्हणाले, ‘तु सुध्दा मागील वेळेस सप्ताह चालू असताना आमच्या विरूध्द गुन्हा दाखल का केला आहे.तु जर आता भांडण सोडविण्यासाठी आला तर तुलाही खतम करून टाकू’ अशी धमकी दिली.
अनिकेत ठोंबे म्हणाला, तु सुध्दा काल माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भगवान ठोंबे सोबत पोलीस स्टेशनला गेला होता,तुलाही जिवंत ठेवत नाही,असे म्हणून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता, रॉड, दांडक्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक गांगर्डे करीत आहेत.