तालुक्यातील गोरेश्वर पतसंस्थेमध्ये १० कर्जदार व गोल्ड व्हॅल्युअर यांनी संगनमत करून बनावट सोने खरे असल्याचे भासवून ४६ लाख ९१ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोल्ड व्हॅल्युरअरसह १० खातेदारांविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाखा व्यवस्थापक जालिंदर जनाजी नरसाळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. दरम्यान, याप्रकरणी पारनेर पोलिसांनी बाळासाहेब संपत कोल्हे याला अटक केली.त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली.
गोरेश्वर पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी आशा बाळासाहेब कोल्हे, भारती अनिल दैवज्ञ (रा. नागेश्वर मंदिराजवळ, पारनेर), राहुल बाळासाहेब कावरे (रा. सिद्धेश्वरवाडी, ता. पारनेर), बाळासाहेब संपत कोल्हे (रा. नागेश्वर मंदिराजवळ, पारनेर), अंबादास दिलीपराव औटी (रा. लोणी रोड, पारनेर), पोपट इंद्रभान सोंडकर (रा. लोणी हवेली, ता. पारनेर)
राजेंद्र अर्जुन काणे (रा. चिंचोली रोड, पारनेर), शंकर पोपट औटी (रा. जुनी पेठ, पारनेर), दिलीप निवृत्ती खोसे (रा. सरकारी दवाखान्याजवळ, पारनेर), सुजाता शैलेंद्र डहाळे (रा. आभूषण ज्वेलर्स, शिवाजी रोड, पारनेर), गोल्ड व्हॅल्युअर शैलेंद्र चंद्रकांत डहाळे (रा. पारनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या गोरेगाव शाखेतून १२ जून २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीमध्ये १० कर्जदारांनी बनावट सोने तारण ठेऊन कर्ज घेतले होते.कर्ज घेतल्यानंतर त्यांनी एक रुपयाही न भरता सर्व खाती थकबाकीमध्ये गेले होते.
पतसंस्थेच्या वतीने कर्जदारांना वारंवार नोटीस पाठवूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. गोल्ड व्हॅल्युअर शैलेश डहाळे याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या पारनेर शाखेतही अशाच प्रकारे बनावट सोने खरे असल्याचे भासवून कर्ज देण्याची शिफारस केली होती.
बँकेकडून कर्जदार व गोल्ड व्हॅल्युअर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर गोरेश्वर पतसंस्था प्रशासनास शंका आल्याने त्यांच्याकडे ठेवण्यात आलेल्या सोन्याची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला गेला.व्हॅल्युअर व खातेदार यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली होती.
वारंवार नोटीस पाठवूनही दखल न घेतल्याने अखेर संस्थेच्या वतीने व्हॅल्युअर व कर्जदारांविरोधात फसवणुकीचा सोमवारी (दि.२३) गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अभय दंडगव्हाण करत आहेत.
गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदार यांनी आपसात संगनमत केले.पतसंस्थेत सोने तारण कर्जासाठी येणारे सोने खरे आहे का ? त्याचे वजन व शुद्धता तपासण्यासाठी लेखी पत्राद्वारे गोल्ड व्हॅल्युअर म्हणून नेमणूक केलेल्या शैलेंद्र चंद्रकांत डहाळे याने १० कर्जदारांनी आणलेले सोने देऊन ते खरे असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार केले.
फसवणुकीच्या उद्देशाने बनावट सोने खरे म्हणून पतसंस्थेत दाखल करून त्या मोबदल्यात १० जणांच्या नावावर वेगवेगळ्या रकमेचे कर्ज उचलण्यात आले.त्यांनी एकही हप्ता न भरता स्वतःच्या फायद्यासाठी पतसंस्थेचा विश्वासघात करून ४६ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.