नेवासा बुद्रुक येथील गोदामात विनापरवाना खतांचा साठा असल्याची टीप कृषी विभागाला मिळाली.पोलिसांना सोबत घेत कृषी पथक घटनास्थळी पोहचले तेव्हा तेथे बनावट खत तयार होत असल्याची धक्कादायक बाब दिसून आली.पथकाने सखोल चौकशी केल्यानंतर बाहेरून कच्चा माल आणून तयार होणारे बनावट खत ब्रँडेड कंपनीच्या नावाने विक्री केली जात असल्याचे उघड झाले.
नेवासा येथील रणजीत भागवत आढाव यांच्याकडे विनापरवाना खतांचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाला खबऱ्याकडून मिळाली.कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी पोलिसांना सोबत घेत नेवासा बुद्रुक येथील जय किसान फर्टिलायझर्स केमिकल्सच्या गोदामात पोहचले,तेव्हा तेथे भरलेल्या व रिकाम्या खतांच्या गोण्या दिसल्या.
सील बंद गोण्यात वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादीत खते तसेच कोणताही मजकूर नसलेल्या ५० किलो वजनाच्या गोण्या मिळून आल्या.तेथील व्यवस्थापक अजित भागवत आढाव यांच्याकडे कृषी अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्याने मोबाईलमध्ये परवाना दाखविला.त्याची शहानिशा केली असता तो घाऊकचा असल्याचे समोर आले.
त्यात उल्लेख केलेली खते व प्रत्यक्षातील खते यात तफावत आढळून आली, त्याचवेळी समोर खताचे तीन ढिगारे दिसले. त्यानंतर अधिक तपासणी करत खत उत्पादन, मार्केटिंगचा कोणताही परवाना नसताना बाहेरून कच्चा माल आणून खत उत्पादन सुरू असल्याचे समोर आले.
तयार झालेले खत जयकिसान फर्टिलायझर्स केमिकल्सच्या नावाने बाजारात विक्री होत असल्याचे निदर्शनास आले.खत उत्पादनाचा किंवा को-मार्केटींगचा अथवा मार्केटींगचा कोणताही परवाना नसल्याचे अजित आढाव यांनी पथकाला सांगितले.
त्यानंतर विनापरवाना, नियमबाह्य पध्दतीने बनावट खत तयार करून त्याची विक्री करत असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले.बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी प्रताप रामदास कोपनर यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांत रणजित आढाव विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनिगम १९५५, खंड ३ (२), खत नियंत्रण आदेश १९८५ आणि भारतीय न्यायसंहिता २०१३ कलम ३१८ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विभागाकडून जिल्ह्यातील खते, बियाणे आणि किटकनाशक विक्री कृषी केंद्राची नियमीत तपासणी करण्यात येते. त्याकरीता तालुका पातळीवर १४ तर जिल्हा पातळीवर एक अशी १५ पथके कार्यरत आहेत, जिल्ह्यात पाच हजारांहून अधिक कृषी केंद्रे आहेत,त्याचीही तपासणी होते.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली कृषी निविष्टा सनियंत्रण समितीही कार्यरत आहे.मात्र या सर्वांना चकवा देत नेवासा बुद्रुक येथे बनावट खत तयार केले जात होते.त्याबाबत खबऱ्याने कळविले नसते तर…किती शेतकयांची फसगत झाली असती? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.