मोबाईलवर सतत ऑनलाइन गेम्स म्हणजे जुगाराच्या जाहिराती सुरू असल्याने अनेकांना ऑनलाइन गेम्सची सवय जडत आहे.यात मुलांसह मुलींचाही मोठा सहभाग असल्याचे आढळून येत आहे.ही सवय आता व्यसनात बदलत असून आयुष्य उद्धवस्त करायला लागली आहे.
त्यामुळे अशा नुकसानकारक जुगारी गेम्स व त्यांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.आता शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आला आहे.
कोणी याचा चांगला उपयोग तर कोणी दुरुपयोगामुळे अडचणीत येत असल्याच्या घटना घडत आहेत.कारण मोबाईलवरील सर्वच सोशल मीडियावर क्षणाक्षणाला ऑनलाइन गेम्सच्या जाहिराती येतात.
त्या माध्यमातून मी जिंकलोय अथवा जिंकलेय आपणही जिंका, त्यासाठी खेळा,असे आवाहन केले जात आहे.सामान्यांसह सेलिब्रेटींकडून केल्या जाणाऱ्या या जाहिरातींच्या प्रभावाखाली तरुणाई येत आहे.
एकेकाळी टाईमपास असलेले मोबाईलवरील ऑनलाइन गेमिंग आता व्यसन बनत आहे.हा गेम सर्वत्र पसरत असून शालेय मुलांपासून तरुण ऑनलाइन गेम खेळत असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागातही दिसते.
अभ्यासाला फाटा देत तहान, भूक, आराम व झोप विसरुन ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेली तरुण पिढी तयार होत आहे. यावर पैसे कमाविण्याची संधी असल्याने अनेकांना जुगाराचे व्यसन जडले आहे.ऑनलाइनमुळे अवैध मटका, क्रिकेट बेटिंग आता अधिकृत बनले आहे.
हे सगळे जुगाराचे व्यसनच आहे.यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आहे.त्या अनुषंगाने ऑनलाइन गेमिंगमुळे तरुणाई आणि कुटुंब उद्धस्त होत आहे.
शालेय मुले, तरुणांनी यापासून दूर राहावे. त्यांच्या हाती मोबाईल देताना ते याकडे वळणार नाहीत,याची खबरदारी पालकांनीही घ्यायला हवी.
ऑनलाइन गेमिंग हाही एक जुगारच आहे.त्याचे व्यसन लागू शकते. सेलिब्रिटींच्या जाहिरातीच्या प्रभावाखाली तरुण वर्ग येऊ लागला आहे.त्यातून आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे तरुणांनी अशा जुगारापासून दूर राहायला हवे.