एटीएम मशीनला पैसे येण्याच्या मार्गावर चिकटपट्टी चिटकवून कोणीतरी अज्ञात चोरट्याने तीन बैंक खातेदारांचे एकूण ४० हजार रुपये परस्पर काढून बँकेची फसवणूक केली.ही घटना केडगाव येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये दि.३० ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
या प्रकरणी शुक्रवारी (दि.२०) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबतची माहिती अशी की एसबीआय बँक केडगाव शाखेच्या बाजुला बँकेचे दोन एटीएम मशिन आहेत.
बँकेचे खातेदार डिंपळे जे. लाड, प्रदीप सोंडकर, मंगल एस. निमसे हे ३० ऑक्टोंबर रोजी बँकेचे बाजुलाच असणारे एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले.त्यांनी एटीएम मशिन मध्ये डेबिट कार्ड टाकून पैसे काढण्याची प्रोसिजर केली असता एटीएम सीआयजीए मधुन त्यांना पैसे मिळाले नाही.
परंतु त्यांचे खात्यातून पैसे कट झाले म्हणून तिघांनी बँकेकडे ऑनलाईन तक्रार नोंदविली.त्यावर बँकेने त्यांचे खाते चेक केले असता डिंपळे जे. लाड यांनी दोन वेळा १० हजार काढण्यासाठी एटीएम मशिनमध्ये प्रोसिजर केल्याचे व प्रदीप सोंडकर यांनी एक वेळा १० हजार रुपये, तसेच मंगल एस. निमसे यांनी एक वेळा १० हजार रुपये एटीएम मधुन पैसे काढण्याची प्रोसिजर केल्याचे निदर्शनास आले.
परंतु त्यांना एटीएम मधुन पैसे मिळाले नाहीत त्यानंतर बँकेने एटीएम मशिन मधील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता दि.३० ऑक्टोंबर रोजी रात्री १० ते रात्री ११.३० वाजण्याचे दरम्यान एटीएम मध्ये एका अज्ञात इसमाने येऊन एटीएम मशीनला पैसे येण्याचे मार्गावर काहीतरी पट्टी चिटकवून निघुन गेला,त्यानंतर हे तिघे खातेदार त्याच एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आल्याचे दिसुन आले.
परंतु अज्ञात इसमाने एटीएम मशीनला पट्टी चिकटवल्यामुळे तीनही खातेदारांचे पैसे मशिन मध्ये अडकल्याने त्यांना पैसे मिळाले नाही.परंतु बँकेने त्यांना त्यांचे पैसे दिलेले आहेत,ते खातेदार एटीएम मधुन बाहेर गेल्यानंतर काही वेळाने त्याच अज्ञात इसमाने एटीएम मध्ये येऊन एटीएम मशीनला चिकटवलेली पट्टी काढून टाकली व ४० हजार रुपये परस्पर काढून घेतले.
अशा प्रकारे एसबीआय बँकेची ४० हजार रुपयाची फसवणुक केली असल्याचे समोर आले.त्यामुळे याबाबत एसबीआय. बँक, केडगाव शाखेच्या व्यवस्थापक अरुधंती पुजारी (रा. सावेडी, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अनोळखी चोरट्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.