शासनाचा कोणताही परवाना नसताना भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅस टाक्या जवळ बाळगून लोकांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता असताना गॅस टाकीतून गॅस काढून अन्य वाहनात भरणाऱ्या २ अवैध रिफिलिंग सेंटरवर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने छापा टाकला.
या कारवाईत गॅस टाक्या, ओमिनी व्हॅन, दोन पॅगो रिक्षा, रिफिलिंग मशीन असा ३ लाख ६२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरातील स्टेशन रोडवरील खालकर हॉस्पिटल समोर पत्र्याच्या शेडमध्ये आणि स्टेशन रोडवरील लोखंडी पुलाजवळील रिफिलिंग सेंटरवर शुक्रवारी (दि.२०) दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांना महिती मिळाली की, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खालकर हॉस्पीटल समोर, नगर पुणे रोडचे डावे बाजुला पत्राचे शेडमध्ये विनोद पोळ हा बेकायदेशीर रित्या,भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅस टाक्या जवळ बाळगून टाकीतून गॅस काढून तो एलपीजी वाहनात अनधिकृतरित्या रिफलींग करीत आहे अशी माहिती मिळाल्याने अमोल भारती यांनी पोलिस पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले.
पथकाने त्या ठिकाणी जाऊन अचानकपणे छापा टाकला असता त्या ठिकाणी एक इसम पांढऱ्या रंगाचे ओमेनी व्हॅन व पॅगो रिक्षा या वाहनात रिफलींगच्या मोटार मशीन सह वजन काट्यावर घरगुती गॅस टाकी उलटी करुन त्यामधून ओमेनी व्हॅनमध्ये व रिक्षात गॅस भरताना मिळुन आला.
पोलिसांनी त्यास त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विनोद मनोज पोळ (वय २४ रा. पाटील हॉस्पीटल शेजारी, कोठी) असे सांगीतले तसेच तेथील ओमेनी व्हॅन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव राजेंद्र भिमराज बडे (वय ३९ रा.बारदरी ता. नगर) व पॅगो रिक्षा चालकाने त्याचे नाव बबन नाथू कातोरे (वय ६० रा. अंबिका विद्यालय शेजारी, केडगाव) असे सांगीतले.
त्या ठिकाणी काही भरलेल्या व काही मोकळ्या टाक्या मिळून आल्याने विनोद पोळ यास घरगुती गॅस टाक्या वापरण्याचा परवाना आहे का असे विचारले असता त्याने असा कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले.
पोलिसांनी तेथून ३० हजार रुपये किमतीची गॅस रिफलिंग मशीन, ४५ हजार ५०० रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या १३ सीलबंद घरगुती वापराच्या गॅस टाक्या, ३ हजार ५०० रुपये किमतीची १ हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची लाल निळ्या रंगाची सीलबंद घरगुती वापराची गॅस टाकी, ६ हजार रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या २ अर्धवट भरलेल्या गॅस टाक्या, ५ हजार ४०० रुपये किमतीच्या २ भारत गॅस कंपनी असे लिहिलेल्या व सील नसलेल्या गॅस टाक्या
८० हजार रुपये किमतीची ओमेनी व्हॅन, (क्र.एम एच २३ ई ७४१२), ५० हजार रुपये किमतीची पॅगो रिक्षा (क्र.एम एच १६ बी सी ०४८२), ६ हजार रुपये किमतीचा अटारी कंपनीचा १ वजनकाटा, व १ लोखंडी काटा, असा २ लाख २६ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी विनोद पोळ, राजेंद्र बडे, बबन कातोरे यांना कोतवाली पोलीसांच्या ताब्यात दिले.दुसऱ्या कारवाईत स्टेशन रोडवरील जुन्या लोखंडी पुलावरुन मल्हार चौकाकडे जाताना शुभम मेन्स पार्लरच्या पाठीमागील पत्राचे शेडमध्ये बेकायदेशीर रित्या शासनाचा कोणताही परवाना नसताना भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅस टाक्या जवळ बाळगून गॅस टाकीतून गॅस काढून तो एलपीजी वाहनात रिफलींग करणाऱ्या सेंटरवर पोलीसांनी छापा टाकून एकास ताब्यात घेतले.
विठ्ठल राजु पारधे (वय १९ रा. मल्हार चौक, अ.नगर) असे त्याचे नाव आहे.तर तेथे आढळलेल्या पॅगो रिक्षा चालकाने त्याचे नाव अनिल मुकुंद भिंगारदिवे (वय-५५ रा. माळीवाडा, झेड पी समोर) असे सांगीतले.
पोलीसांनी तेथून ३० हजार रुपये किमतीची एक गॅस रिफलींग मशीन, ३१ हजार ५०० रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या ९ सीलबंद घरगुती वापराच्या गॅस टाक्या, ३ हजार रुपये किमतीची भारत गॅस कंपनीच्या १ अर्धवट भरलेल्या घरगुती वापराच्या गॅस टाक्या, १८ हजार ९०० रुपये किमतीच्या ७ भारत गॅस कंपनीच्या गॅस टाक्या, ५० हजार रुपये किमतीची पॅगो रिक्षा (क्र.एम एच १४ सी ई ०५६६), ३ हजार रुपये किमतीचा युनिटेक कंपनीचा १ वजनकाटा असा १ लाख ३६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८७,२८८,१२५ सह अत्यावश्यक वस्तु कायदा १९९५ चे कलम ३ व ७ प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार राजीव जाधव, महेश मगर, संतोष ओव्हाळ, हेमंत खंडागळे, सागर द्वारके यांनी केली