अहिल्यानगर मधील मुकुंदनगर मधून एक भयंकर घटना समोर आली आहे.ज्यात अल्पवयीन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले आणि वादाचे रूपांतर हत्येत झाले.हत्येनंतर आरोपी फरार झाला असून पोलसांद्वारे त्याचा शोध चालू आहे.

मेडिकलच्या दुकानात उभ्या असलेल्या ४ मित्रांमध्ये चेष्टा-मस्करी सुरु असताना त्याचा राग येवून दोन मित्रांमध्ये वाद झाले. त्यातील एकाने दुकानातीलच कात्री घेवून दुसऱ्या युवकाच्या पोटावर वार केले.

त्यात गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाल्याची घटना मुकुंदनगर मध्ये घडली आहे. जीशान शेख (वय १८) असे मयत युवकाचे नाव आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, मुकुंदनगर परिसरात दर्गादायरा रोडवर बड़ी मरियम मशीद जवळ असलेल्या जिलानी मेडिकोज या दुकानात ४ मित्र शुक्रवारी (दि.२९) रात्री उभे होते, त्यांच्यात बराच वेळ चेष्टा-मस्करी सुरु होती.

सर्वजण हसत खिदळत असताना अचानक शमशोद्दीन निजामोद्दीन खान या युवकाने मेडिकलच्या कौंटरवर असलेली कात्री उचलून जीशान खान याच्या अंगावर धावून गेला व त्याच्या पोटावर कात्रीने वार केले.

या वेळी दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली मेडिकलमध्ये उपस्थित असलेल्या इतर दोघा युवकांनी त्यांचे भांडण सोडवले. त्यावेळी जीशान याच्या पोटातून रक्त येवू लागल्याने त्याला काहींनी तात्काळ उपचारासाठी नगर मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

शनिवारी सकाळी ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली.त्यामुळे मयताच्या नातेवाईकांनी तसेच इतर नागरिकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.

या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, भिंगार कॅम्पचे स.पो. नि. जगदीश मुलगीर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट दिली.

मस्करी व नंतर झालेल्या हल्ल्याची घटना तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सदर फुटेज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

या हल्ल्यानंतर हल्लेखोर शमशोद्दीन निजामोद्दीन खान हा पसार झालेला असून पोलिसांची पथके त्याच्या मागावर रवाना झाली आहेत. शनिवारी (दि.३०) दुपारी उशिरापर्यंत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.