राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याचे अपहरण करून खून करण्यात आला.या खटल्याची सुनावणी सोमवारी (दि.९) प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर सुरू झाली.सलग दोन दिवस खटल्याचे कामकाज चालणार आहे.राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी घेतलेल्या सरतपासणीत माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे यांनी घटनेची आपबीती सांगत राहुरी न्यायालयातूनच दोघांचेही अपहरण केल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, दुपारी त्याला न्यायालयात चक्कर आल्याने खटल्याचे कामकाज थांबविण्यात आले.मंगळवारी (दि. १०) पुन्हा सुनावणी होणार आहे.राहुरी न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या आढाव दाम्पत्याचा २५ जानेवारी २०२४ रोजी अपहरण करून खून करण्यात आला.अॅड. राजाराम जयवंत आढाव व अॅड. मनीषा आढाव असे या दाम्पत्याचे नाव आहे.
या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून संशयित मुख्य आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग (रा. उंबरे, ता. राहुरी), भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा, ता. राहुरी), शुभम संजित महाडिक (रा. मानोरी, ता. राहुरी), बबन सुनील मोरे, हर्षल दत्तात्रय डोकणे (दोघे रा. उंबरे, ता. राहुरी) यांना अटक केली.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे आरोपी हर्षल दत्तात्रय ढोकणे माफीचा साक्षीदार झाला.सोमवारी (दि. ९) आरोपीना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने न्यायालयासमोर सर्व हत्याकांडाचा पहिल्यापासूनचा घटनाक्रम मांडला…
आरोपी बबन मोरे व मी एकाच गावातील असून, एकमेकांना ओळखतो. तसेच अन्य आरोपींना ओळखत असून, त्यांची नावे त्याने न्यायालयासमोर सांगितली. प्रसाद शुगर साखर कारखान्यात ऊस काट्यावर तीन महिन्यांपासून नोकरी करीत होतो. २४ जानेवारी २०२४ रोजी बबन मोरे याचा मला फोन आला.
उद्या आपल्याला गेम करायचा आहे.तू रॉयल पॅलेसजवळ येऊ थांब.त्यात तुला पैसे मिळणार आहेत,असे त्यांनी सांगितले. त्याने नंतर हा फोन शुभम महाडिकला दिला.त्यानंतर शुभमने वकिलांना फोन लावण्यास सांगितले.पाथर्डी कोर्टात जामिनासाठी जायचे आहे,असे वकील आढाव यांना सांगितले.
त्यानंतर आम्ही पाच जण गाडीमध्ये बसलो.आम्हाला मोबाईल बंद करण्यास सांगितले.राहुरी न्यायालयासमोर आल्यानंतर किरण व शुभम वकिलांना आणण्यासाठी गेले.वकिलाला कारमध्ये बसविले व आम्ही चार जण मागे बसलो.ब्राह्मणीजवळ निर्जस्थळी त्यांना घेऊन गेलो.कारमध्येच किरण याने वकिलाचे हात दोरीने बांधले.वकिलाने विरोध केला असता त्याने मारहाण केली.
तुमचा मुलगा साई याने आळेफाटा येथे मुलीला पळवून आणले आहे.ते प्रकरण मिटवायचे असेल तर १० लाख द्यावे लागतील.त्यावर मी मुलासोबत बोलतो, असे वकील म्हणाले. त्यानंतर किरण याने त्यांना सांगितले की,तुमच्या पत्नीला बोलावून घ्या.वकिलाने फोन केल्यानंतर शुभम तुला घेण्यासाठी येईल असे सांगितले.
तोपर्यंत आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो.शुभम याने अॅड. मनीषा आढाव यांना राहुरी न्यायालयातून आणले.त्यानंतर ब्राह्मणी येथे एका निर्जनस्थळी गेलो. त्या वेळी अॅड. आढाव यांना कारमध्ये दोरीने बांधल्याने अॅड. मनीषा आढाव यांनी पाहिले.
त्यांनी कारमध्ये बसण्यास नकार दिला असता किरण याने ढकलून कारमध्ये बसविले.पंचाने त्याचे हात बांधले.तो पंचा न्यायालयात दाखविण्यात आला.किरण याने हेच आढाव वकील दाम्पत्य असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर आढाव यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी निघालो.
वकिलाच्या बंगल्यावर असलेल्या कामगारास घरी जाण्यास सांगा असे किरण याने वकिलांला सांगितले.वकिलाने फोन करून कामगाराला घरी पाठविले.वकील दाम्पत्याला घेऊन आरोपी त्यांच्या बंगल्यावर घेऊन गेले,असे माफीचा साक्षीदार असलेला संशयित आरोपी हर्षल ढोकणे याने सांगितले.
दरम्यान, ढोकणे याला न्यायालयात चक्कर आल्याने कामकाज थांबविण्यात आले.पुढील सुनावणी मंगळवार (ता. १०) रोजी होणार आहे. सरकारी पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम बाजू मांडत आहेत. तर, मुख्य आरोपींतर्फे नाशिकचे अॅड. सतीश वाणी बाजू मांडत असून अॅड. वैभव बागुल, अॅड. जर्जरी शेख, अॅड. कश्यप तरकसे अन्य आरोपीतर्फे काम पाहत आहेत.