हल्लीच्या काळात गुन्हेगारीच्या प्रमाणात भयंकर वाढ झाल्याचे दिसून येत आहे.तरुण मुले रागाच्या भरात गुन्हा करतात आणि त्याचे परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावे लागतात.स्वतःच्या आयुष्यासोबतच दुसऱ्यांचे आयुष्य खराब करून टाकतात.

तरुणांकडून होणाऱ्या दररोजच्या गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक अजिबात राहिलेला नसून गुन्हेगारांच्या मनातही पोलिसांची भीती नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पोलिसांनी वाढती गुन्हेगारी बघता यावर लवकर तोडगा काढायला पाहिजे.

केडगाव हे अहिल्यानगर मधील एक उपनगर आहे.केडगावमधील वैष्णवनगर या ठिकाणातून एक बातमी समोर आली आहे ज्यात दोन गटांत वाद होवून हाणामारीची घटना घडली असून एका तरुणावर किरकोळ कारणावरून चाकू हल्ला करून जखमी केले आहे.

या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चाकू हल्ल्यात जखमी सुनील अंबादास पवार (वय ३५, रा. वैष्णवनगर, तिरंगा चौक, केडगाव) यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोर्या (पूर्ण नाव नाही, वय अंदाजे २५, रा. वैष्णवनगर, केडगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘सोमवारी (दि. २५) रात्री नऊ वाजता मी माझे प्लबींगचे काम उरकुन माझे घरी जात असतांना भोर्या हा मला वैष्णव चौकात भेटला व २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघाताच्या कारणातून त्याने चाकूने माझ्यावर हल्ला करून जखमी केले.

दुसऱ्या गटाच्या सुनीता संतोष जाधव (वय ४०, रा. वैष्णवनगर, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सनी पवार (पूर्ण नाव नाही) व त्याच्या दोघा भावांविरूध्द (नावे नाहीत) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनीता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘सोमवारी (दि. २५) रात्री आठ वाजता सनी पवार व त्याचे दोन भाऊ त्यांच्याकडे आले.तुमचा मुलगा राहुल कुठे आहे असे विचारून शिवीगाळ केली.

मुलगा राहुल तेथे आला असता त्याला लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले.मोठा मुलगा शुभमला देखील त्यांनी मारहाण केली. तुम्ही येथे राहायचे नाही, तुम्ही येथून निघून जायचे अशी त्यांना धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.