गोदावरी पात्राजवळ असलेल्या गोवर्धन हद्दीमध्ये अवैध दारू गुत्याविरोधात रामपूर येथील ८० ते ९० महिलांनी रुद्रावतार घेत तो बंद करण्यास सांगून देखील न ऐकल्याने झोपडीवजा दुकान असणारा हा दारूचा गुता जाळला तसेच वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेलच्या मागील बाजूस असणाऱ्या उसात दारूच्या शंभरहून अधिक बाटल्या फोडून टाकल्या.

दारूमुळे गावातील महिलांच्या प्रपंचाची हानी झाली.घरातील कमावत्या व्यक्तीसह मुलेदेखील दारूच्या व्यसनाधीन झाले. अनेकदा अवैध दारूचे दुकान बंद करण्यास सांगून सुद्धा संबंधिताने न जुमानल्याने आक्रमक महिलांनी गोवर्धन येथील ओढ्यातील झोपडीवजा दारूचा गुत्ता जाळला.

तर वीरगाव (ता. वैजापूर) पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलच्या पाठीमागील ऊसातील देखील अवैध दारूच्या सुमारे शंभरपेक्षा अधिक दारूच्या बाटल्या आक्रमक पवित्रा घेतलेल्या महिलांनी फोडून टाकल्या.यावेळी श्रीरामपूर तालुका व वीरगाव पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.

महिन्यांपासून रामपूर (कोकरे) येथील महिलांनी दारूबंदीसाठी ग्रामसभा घेत पोलीस अधीक्षक तसेच दारू उत्पादन शुल्कचे अधिक्षक यांना महिलांनी स्वः त नगर येथे जाऊन पत्र देत गोदावरी भागातील दारू बंद करण्याची विनंती केली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दारू उत्पादन शुल्कचे अधिकारी यांनी सुरुवातीच्या काळात काही ठिकाणी रेड केल्याने दारू बंद झाली होती.त्यानंतर रामपूर गाव वगळता लगतच्या गावांमध्ये अवैद्य दारु व्यवसाय पुन्हा झाल्याने रामपूर येथील लहान मुलांसह पुरुष मंडळी दारूच्या आहारी गेली.

सदर महिला दैनंदिन मजुरीचे काम केल्यानंतर रात्रीच्या वेळी पती-मुले दारू पिऊन व्यसनाधीन होऊन प्रत्येक कुंटूबात कलह निर्माण होत असल्याने अखेर रविवारी १ रोजी सकाळी ९ च्या सुमारास रुद्रावतार घेत महिलांनी प्रथमतः गोवर्धन हद्दीतील ओढयात काटेरी कुंपणात सुरू असलेले अवैध दारूच्या दुकानावर हल्ला चढवत संबंधित दारू विक्री करणाऱ्या दुकानदाराला समजून सांगुन न ऐकल्याने आक्रमक महिलांनी काडीची पेटी आणि पेट्रोलच्या साह्याने सदर झोपडी वजा कापडी शेडला आग लावून दिली.

त्यानंतर या महिलांनी मोर्चा येथील गोदावरी नदीच्या पलीकडे विरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बाभुळगाव गंगा शिवारातील हॉटेलमध्ये जाऊन संबंधित हॉटेल दुकानदाराला समज देत आमच्या गावातील लोकांना / मुलांना दारू न देण्याचा सल्ला दिला होता.

पण तरी सुद्धा त्यांनी पोरांना दारू दिल्याने या महिलांनी हॉटेलच्या पाठीमागे जाऊन उसात लपविलेल्या १०० पेक्षा अधिक बाटल्या रस्त्यालगत आणून फोडल्याने मोठ्या प्रमाणात काचाचा खच जमला होता.तर रस्यावरील महिलांच्या गर्दीमुळे वाहनांची देखील कोंडी झाली होती.

गावचे सरपंच नितीन शिंदे व ग्रामपंचायत सदस्य अमित कोकरे यांनी सांगितले,आमच्या गावात दारूबंदी झाली असून गावालगत काहींनी अवैध दारूची उघडल्याने तरुण पिढी तसेच अबालवृद्ध पुन्हा व्यसनाच्या आहारी जाऊन दिवसभराची कमाई दारूमध्येच घालत असून यामुळे मजुरी काम करून घरी आलेल्या महिला मातांना रोजच त्रास होत आहे.

दारूच्या व्यसनामुळे आमच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने मी रोजंदारी करून लहान लेकरांचा आणि घरातील वृद्ध व्यक्तीचा सांभाळ ही तारेवरची कसरत करते.यापूर्वी गावात अवैध दारूचे दुकान होते ते बंद झाले असले तरी गावाच्या शेजारी अनेकांनी अवैध दारूचे अड्डे थाटल्याने मुलेसुद्धा व्यसनाधीन होत आहेत.माझे पती गेल्याचे दुः ख आहे. इतर महिलांवर अशी वेळ येऊ नये.त्यामुळे अवैध दारू विक्री कायमची बंद करावी असे एका महिलेने आपले मत मांडले

गावालगत असलेले श्रीरामपूर व वैजापूर या दोन्ही तालुक्याच्या पोलिस स्टेशन हद्दीत गावालगतचे अवैध दारू व्यवसाय त्वरीत बंद करण्यात यावे, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक्षक यांना महिलांसह कारवाई करा अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा देणार असल्याचे सरपंच नितीन शिंदे व अमित कोकरे यांनी सांगितले.

या आंदोलनात छबुबाई धनवटे, बबई धनवटे, ताराबाई इरसे, संगिता कोळेकर, रुपाली कुसळकर, रुक्मिणी उपळकर, विजया खैरे, संगिता खैरे, सुरेखा पिटेकर, इथाबाई पांढरे, सुमनबाई जाधव, गं.भा.रेखा जाधव, सुनीता धनवटे, ज्योती पांढरे, आशाबाई पांढरे, रेश्मा धनवटे, सुमनबाई धनवटे, आशाबाई भडांगे, मनीषा धनवटे, सौ. वैशाली कोळेकर, सुरेखा धनवटे, मनीषा उपळकर, स्वाती कोळेकर,रेखा कुसळकर, कोमल धनवटे, सोनाली धनवटे आदी उपस्थित होत्या.