आईचे दागिने गहाण ठेवणाऱ्या भावाबद्दल अपशब्द वापरत भावाने मुलासह त्याची हत्या केल्याची घटना अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे घडली होती.
या खूनप्रकरणी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बाप- लेकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.तर अन्य दोन महिला आरोपी असलेल्या सासू-सुनेची निर्दोष मुक्तता केली आहे.
मार्तंड मनोहर आरोटे (वय ६०), मयूर मार्तंड आरोटे (वय २२, दोघेही रा. खंडोबाची वाडी, ब्राह्मणवाडा, ता. अकोले) अशी शिक्षा झालेल्या बाप-लेकांची नावे आहेत.
तर शकुंतला आरोटे आणि सोनाली आरोटे या सासू सुनेची निर्दोष मुक्तता करण्यात आली.११ मार्च २०२२ ला ब्राह्मणवाडा (ता. अकोले) येथे ही घटना घडली होती.
आरोपींनी केलेल्या मारहाणीत रवींद्र आरोटे याचा मृत्यू झाला होता.रवींद्र आरोटे याची पत्नी ललिता आरोटे हिने दिलेल्या जबाबावरून अकोले पोलिसांनी मार्तंड आरोटे, मयूर आरोटे, शकुंतला आरोटे, सोनाली आरोटे अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
तत्कालीन पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी याप्रकरणी तपास करत चारही आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते.
न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले.या खटल्यात सहाय्यक सरकारी वकिलांनी सात साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयासमोर नोंदविल्या.
त्यात फिर्यादी आणि जखमीवर वैद्यकीय उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी आरोपी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या खटल्याचा निकाल दिला.