जिल्ह्यातील क्राइम रेट गेल्या दोन वर्षांत वाढला आहे. गेल्या अकरा महिन्यात आरोपींनी १०४ जणांचा गेम वाजविला असून, जानेवारीत पैशांसाठी राहुरी येथील वकील दम्पत्याचा खून झाला.या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती.विविध संघटनांनी आंदोलन केल्याने वातावरण ढवळून निघाले.

जिल्ह्यात खून, दरोडो, चोरी, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरोड्याच्या गुन्ह्यांचीही संख्या वाढली आहे. किरकोळ कारणातून खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्यंतरी तपोवन रोड परिसरात कामगाराचा चाकूने वार करत खून करण्यात आला.

किरकोळ कारणातून कोयता तसेच चाकूने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.शहरासह ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यांत खुनाच्या गुन्ह्यांची नोंद होत असून, गेल्या ११ महिन्यांत १०४ जणांचा खून झालेला आहे.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.तपास पूर्ण करून काही गुन्ह्यांचे दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाचे दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असून, त्यावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.याशिवाय इतरही खुनाच्या गुन्ह्याचे दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे. या वर्षात किरकोळ कारणातून संपविल्याच्या सर्वाधिक घटना घडलेल्या आहेत.

चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेविकेने मुलीच्या पोषण आहाराचे साहित्य घेण्यासाठी बोलाविले.आरोपी अंगणवाडीत साहित्य घेण्यासाठी गेला.अंगणवाडी सेविका एकट्याच असल्याचे पाहून त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

त्यास विरोध केल्याने आरोपीने अंगणवाडी सेविकेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जवळच असलेल्या नदीपात्रात फेकून दिला.पोलिसांनी चोवीस तासात आरोपीला अटक करून मृतदेहाचा शोध घेतला.

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे गावठी कट्टट्ट्यातून गोळी झाडून तरुणाचा खून केल्याची घटना नोव्हेंबरमध्ये घडली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मयताचा मृतदेह नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील नदीपात्रात टाकला होता.मृतदेह सापडल्यानंतर या घटनेला वाचा फुटली.पोलिसांनी तपास करत आरोपींना अटक केली.

जादूटोणा केल्याच्या संशयावरून आरोपीने महिलेचा खून केल्याची घटना नेवासा तालुक्यातील झापवाडी शिवारात घडली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींना अटक केली.ही महिला आरोपीसोबत दौंड येथून देवदर्शनासाठी नेवासा येथे आली होती तेव्हा ही घटना घडली.