जिल्ह्यातील मोबाइल,सोन्याचे दागिने पाकीटमारी,वाहने,किमती वस्तू चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण घटले असल्याचे समोर आले आहे.मागील ११ महिन्यांत जिल्ह्यात ३ हजार चोरीच्या घटना घडल्या पण तपास मात्र पाचशेच गुन्ह्यांचा लागला आहे.

जिल्ह्यात हाणामाऱ्या, वाद, जीवे मारण्याची धमकी, खून, खुनाचा प्रयत्न, अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.अशा गुन्ह्यांच्या तपासाला पोलिसांचे प्राधान्य असते.इतर गुन्ह्यांच्या तपासाबाबत मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

पोलिस ठाण्यांच्या स्तरावरील ज्या गुन्ह्यांचा तपास असतो,त्या गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहतो.पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा वेळेत छडा लावून सर्वसामान्यांना न्याय मिळणे अपेक्षित असते.

मागील जानेवारी ते डिसेंबर २०२४ या दरम्यान चोरीचे २ हजार ९४१, तर घरफोडीचे ७१२ गुन्हे नोंदविले गेले.मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.गुन्ह्यांचे प्रमाण कमी असले तरी गुन्ह्यांच्या तपासात मात्र फारशी प्रगती नाही.

कारण ११ महिन्यांत चोरीच्या तीन हजार घटना घडल्या आहेत.यातील ५१९ चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण कमी आहे.घरफोडीच्या ७१२ घटना घडल्या आहेत यातील १२१ गुन्हे उघड झाले आहेत.

त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्ह्यात पोलिसांची संख्या ३ हजार आहे.मात्र गुन्हे उघड होण्याचे प्रमाण नगण्य दिसते.शहरासह ग्रामीण भागात २०२३ मध्ये चोरीचे ३ हजार ९६० गुन्हे दाखल होते.मागील ११ महिन्यात चोरीचे २ हजार ९४१ गुन्हे दाखल झाले आहेत.

मागील वर्षीच्या तुलनेत १ हजार घटनांमध्ये घट झाली आहे.गेल्या वर्षभरात गुन्हेगारांवर कारवाया करत पोलिसांनी तडीपार केले.त्यामुळे भुरटे चोरटे जिल्ह्यातून पसार झाले असल्याचे सांगितले जाते.

शहरासह जिल्ह्यात दरोड्याच्या ३२ घटना घडल्या आहेत.यातील ३१ दरोड्याचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेने २० गुन्हे उघड केले असून,उर्वरित दरोड्याचे गुन्हे पोलिस ठाण्यांनी उघड केले आहेत.

गेल्या ११ महिन्यात जबरी चोरीच्या २६९ घटना घडल्या आहेत.याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेले आहेत.जबरी चोरीचे १२३ गुन्हे उघड झाले आहे. तपास लांबणीवर पडल्यास मुद्देमाल मिळण्याचे प्रमाण कमी होते.

गेल्या ११ महिन्यात चोरट्यांनी १ कोटी ५५ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.पोलिसांनी विविध गुन्ह्यांचा तपास ८४ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल परत मिळाला असून,संबंधितांना तो परत केला

शहरासह जिल्ह्यात गेल्या अकरा महिन्यात ७१२ घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत.यातील १२१ गुन्हे उघड करण्यात आले आहे.उर्वरित घरफोड्यांचा छडा लागलेला नाही.

न्यायासाठी सर्वसामान्य नागरिक पोलिस ठाण्यात हेलपाटे मारत आहेत.चोरीला गेलेला मुद्देमालही त्यांना परत मिळालेला नाही.त्यामुळे सर्वसामान्यांतून पोलिसांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.