पाथर्डी अहिल्यानगर रोडवर अपघातांचे प्रमाण वाढले असून या मार्गावर वाहन चालकांनी गाड्या सावकाश चालवणे गरजेचे आहे.पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव शिवारामध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

किरण लक्ष्मण धोत्रे (वय २०, रा. नाथनगर) असे अपघात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहेत.माळी बाभुळगाव शिवारातील पाथर्डी अहिल्यानगर रोडवर हॉटेल प्रेम नजीक पाथर्डीवरून अहिल्यानगरकडे जाणारी व्हॅगनार कार व पाथर्डीकडे येणारी दुचाकी यांच्यात गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक झाली.

ही धडक एवढी जोरदार होती की,कारचे पुढील बंपर ठोकून दुचाकीचे पुढील चाक कारच्या ड्रायव्हर साईटच्या चाकामध्ये जाऊन गुंतले.यात किरण धोत्रे हा मयत झाला.अपघातानंतर प्रथम या सर्व जखमींना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.

मात्र यातील किरण धोत्रे हा जागीच मयत झाल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.सतीश पवार व अजय पवार हे दोन जण गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव, पोलिस नाईक सोमनाथ बांगर, सुहास गायकवाड, संदीप बडे, दुर्योधन म्हस्के,राजेंद्र सुद्रुक यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदतकार्य केले.या अपघाताचा पोलिस हेडकॉन्स्टेबल अलत्ताफ शेख पुढील तपास करत आहे.