न्यायालय परिसरातील शांती आणि नियमांची पायमल्ली करत एका विवाहाच्या मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजवणाऱ्या वाहनावर राहुरी पोलिसांनी कारवाई केली.कर्कश डीजेमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा आणि न्यायालयीन कामकाजात झालेल्या अडथळ्याचा विचार करून पोलिसांनी डीजे जप्त केला.

ही घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी घडली असून,पोलिस पथकाच्या तत्परतेचे तालुक्यातून स्वागत होत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राहुरी शहरातील न्यायालय परिसरात विवाह मिरवणूक सुरू होती.

या मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात होता,ज्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले.तसेच,न्यायालयातील कामकाजातही अडथळा निर्माण झाला.नागरिकांनी त्रासाला कंटाळून ११२ आपत्कालीन क्रमांकावर कॉल करत तक्रार नोंदवली.

तक्रार मिळताच अहिल्यानगर येथील मुख्यालयाने राहुरी पोलिस ठाण्याला तातडीने कारवाईचे निर्देश दिले.पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील,नदीम शेख,प्रमोद ढाकणे, जालिंदर धायगुडे, आणि चालक शकूर सय्यद यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.

पोलिस पथकाला घटनास्थळी डीजे कर्कश आवाजात वाजत असल्याचे आढळून आले.त्यांनी तत्काळ डीजे वाहन ताब्यात घेत न्यायालय परिसरातून हटवले आणि राहुरी पोलिस ठाण्यात आणले.उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

डीजेच्या मोठ्या आवाजाचा त्रास सध्या लग्नसराईसह इतर कार्यक्रमांमध्ये कर्कश आवाजात डीजे वाजवणे एक सामान्य बाब झाली आहे; मात्र यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागतो. डीजेमुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

नागरिकांचा प्रतिसाद राहुरी पोलिस पथकाच्या या त्वरित कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.डीजेच्या कर्कश आवाजामुळे होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे,असे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करावे अशी पोलिस प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करून शांतता राखावी.तसेच, डीजेसारख्या कर्कश यंत्रणा वाजवून इतरांना त्रास होणार नाही,याची काळजी घ्यावी.नियमांचे उल्लंघन करणाऱ्याऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.