सध्या जिल्ह्यात चोरांचा आणि दरोडेखोरांचा सुळसुळाट सुटला असून रोज कुठे ना कुठे दरोडा,चोरी,मारामारी,इत्यादींच्या घटना घडत असल्याच्या चर्चा जिल्ह्यात ऐकू येत असतात.
श्रोगोंदा तालुक्यातील कोळगाव मधून दरोड्याची घटना समोर आली आहे.या दरोडेखोरांनी घरात असलेल्या पती पत्नीला मारहाण करून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास करत धूम ठोकली आहे.
याबाबत सविस्तर घटना अशी आहे कि,रविवारी सकाळी पाच वाजता च्या सुमारास राजेंद्र लगड हे आपल्या कुटुंबासोबत घरात झोपलेले असताना रविवारी पहाटे चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी घराचा आतून लावलेला दरवाजा कटावणीच्या साह्याने उघडण्याचा प्रयत्न करत असताना लगड यांनी दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना दरोडेखोरांनी धारदार वस्तूने लगड यांच्यावर वार करून घरात प्रवेश केला.
चोरटयांनीं घरात प्रवेश केल्यावर घरातील सामानाची उचकापाचक करून मौल्यवान ऐवज कुठे ठेवला आहे,असे विचारत दोघांना लाकडी दांडक्याने आणि धारधार शस्त्राने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
घाबरलेल्या गीता लगड यांनी गळ्यातील तसेच कानातील सोन्याचे दागिने काढून दिले. मात्र,यावेळी एका कानातले निघत नसल्याने चोरट्यांनी त्यांच्या कानातील ओरबाडून काढले.
तसेच राजेंद्र लगड यांच्या पँटच्या खिशात असलेले दहा हजार रुपये बळजबरीने काढून घेतले.चार ते पाच दरोडेखोरानी धारदार शस्त्राने केलेल्या या मारहाणीत दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवले आहे.
दरोडेखोर घरातील दीड तोळ्यांचे सोन्याचे दागिने, १० हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाले.माघारी जाताना चोरट्यांनी खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करत इतर खोल्यांकडे मोर्चा वळवला.त्यावेळी राजेंद्र लगड यांनी जोरजोरात आरडाओरडा सुरू केल्याने दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.
आरडाओरडा झाल्याने शेजारी राहणारे सयाजी लगड आणि संजय नलगे यांनी धाव घेत राजेंद्र लगड आणि गीता लगड यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत तपास कामी सूचना केल्या.
या घटनेची माहिती बेलवंडी पोलिसांना दिल्यानंतर सुद्धा पोलिस वेळेवर आले नसल्यामुळे कोळगाव ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.राजेंद्र लगड यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कोळगाव आणि परिसरात चोऱ्याचे प्रमाण खूप वाढले आहे.मात्र,अजूनही एकाही चोरीचा लागलेला नाही. पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांचे तपासाकडे दुर्लक्ष होत आहे. वेलवंडी पोलिसांच्या कामकाजात आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा कोळगाव ग्रामस्थांनी दिला आहे.