लग्न जुळविण्याचे काम पूर्वी काही ज्येष्ठ मंडळी पुढाकार घेत होती.त्यांच्याकडे विश्वासार्हता होती.आता मात्र धावपळीच्या जीवनात लग्न जुळविण्याच्या कामासाठी कोणीही पुढाकार घेत नाहीत.त्यामुळे संकेत स्थळावरून लग्न जुळविले जात आहे. मात्र,त्यात फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत.

संकेत स्थळावर लग्नासाठी जोडीदार निवडताना घ्यावयाच्या काळजी बाबत मात्र माहिती नसते.लग्न जुळविणारे काही तोतया मध्यस्थी तसेच तोतया नवरीचे अनेक प्रकार जिल्ह्यात उघडकीस आलेले आहेत. लग्न होताच नवरीने धूम ठोकली व सोबत दागदागिने व पैसेही लंपास केल्याचे गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

मात्र,तरीही वर पक्षाकडील मंडळींनी त्यातून बोध घेतल्याचे दिसत नाही.विशेषतःसंकेतस्थळावर अनेक बनावट प्रोफाईल दिलेले असतात.संकेतस्थळावर लग्न जुळविणाऱ्या अनेक कंपन्या सध्या कार्यरत आहेत.

मात्र,जोडीदाराच्या माहितीची सत्यता तपासणीची जबाबदारी कंपन्या स्वीकारत नाहीत.संकेतस्थळावर मुलगा अथवा मुलीची देण्यात आलेली माहिती खोटी अथवा अपूर्ण असू शकते.त्याची पडताळणी प्रत्यक्ष करणे गरजेचे असते.

संकेतस्थळावर देण्यात आलेल्या फोटोवर विश्वास ठेवता येणार नाही.लग्न जुळविण्यापूर्वी पैशांची मागणी केली जाऊ शकते.मात्र,त्यात अनेकदा फसवणुकीची शक्यता असते.

ऑनलाइन विवाह जुळविताना संकेतस्थळांची विश्वासार्हता तपासावी.त्यावर देण्यात आलेल्या मुलगा अथवा मुलीच्या प्रोफाईलवर लगेचच विश्वास ठेवू नये.प्रत्यक्ष खात्री करूनच लग्नाचा निर्णय घ्यावा असे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले.