राहुरी तालुक्यात शासनाची बंदी असलेल्या गुटखा विक्री बाबत ग्रामस्थांकडून जून महिन्यात आवाज उठवला गेला होता. त्यानंतर या व्यवसायाला बऱ्याच प्रमाणात आळा बसला होता.परंतू,गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात बंदी असलेल्या गुटक्याची विक्री करणारी आधीची यंत्रणा राहुरी खुर्द मधून परत एकदा चालू झाली आहे.
या बद्दल अन्न व औषध विभागाला थांगपत्ता नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.संपुर्ण राज्यात गुटखा बंदी असूनही राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू झाली आहे.
याबाबत अशीही माहिती समोर आली आहे की, राहुरी खुर्द येथील एका तालुकास्तरावरील वितरकाने पुन्हा आपले पाय रोवण्यास सुरूवात केली असून त्याला नगरच्या वितराकडून गुटखा पोहच केला जात आहे.
त्यानंतर सर्व साखळी फिरून हाच गुटखा तालुक्यात सर्व खेडे व शहरात वितरण करण्याची यंत्रणा पुन्हा कार्यरत झाली आहे.या धंद्यातून मोठी माया खालपासून वरपर्यंत शासकीय यंत्रणेला पोहोच होत असल्याने व तसेच विधानसभा निवडणूक झाल्यापासून ‘माझे कोणीच काही करू शकत नाही’ अशा तोऱ्यात हा राहुरी खुर्द येथील गुटखा किंग अवैध व्यवसाय करत आहे.
तसेच हा व्यापारी काही प्रकारचा बनावट गुटखा खेडोपाडी वितरीत करून आपले उखळ पांढरे करून घेत आहे.जर याबाबत एखाद्या दुकानदाराने त्याच्या कडे गुटखा बनावट असल्याची तक्रार केली तर तो व्यापारी त्याला दमबाजी सुध्दा करत असल्याचे काही दुकानदारांनी सांगीतले.
तालुक्यात परत एकदा सुरू झालेल्या या धंद्याला पोलीस व अन्न भेसळ प्रशासनाच्या वरिष्ठांनी त्वरित लक्ष देऊन आळा घालावा व धोक्यात येत असलेल्या तरुण पिढीला वाचवावे अशी मागणी राहुरीकर करत आहे.