मजुरांची ५. १८ लाख रूपयांची रोकड रक्कम देण्यासाठी दुचाकीवरुन निघालेल्या एका मुकादमाला सहा सात कारमधून आलेल्या लुटारूंनी कत्तीचा धाक दाखवून सिनेस्टाईल पद्धतीने राहाता तालुक्यातील नांदूर शिवारात लुट केली होती. दरम्यान, याप्रकरणी चार लुटारुंना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अल्पावधीतच राहाता तालुक्यातील वाकडी इथून अटक केली आहे.

दारासिंह तुकाराम डावर (३८, रा. नांदुर, ता. राहाता) है (दि. २८) रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मजुरांना मजुरीची रक्कम वाटप करण्यासाठी दुचाकीवरुन घेऊन जात होते. नांदुर येथे स्विफ्ट कारमधून आलेल्या ६-७ लुटारुंनी डावर यांच्या मोटारसायकलला धडक दिली आणि त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून डावर यांच्याकडील ५. १८ लाख रूपये रोख रक्कम हिसकावून लुटून नेली होती.

याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश देत या गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याच्या सुचना केल्या होत्या.

दिनेश आहेर यांनी पोलिस अंमलदार मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, अतुल लोटके, फुरकान शेख, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, रमिजराजा आत्तार व अरूण मोरे यांचे पथक नेमले.तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.

(दि. ३०) रोजी तपास पथकास गुप्त बातमीदाराने खबर दिली की, हा गुन्हा इम्रान आयुब शहा (रा. वॉर्ड नं.१, श्रीरामपूर) याने साथीदारांसह केला आहे. गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार (क्र. एम एच २०-सी सी ९५००) मधून आरोपी गणेशनगर येथून वाकडी रस्त्याने श्रीरामपूरकडे येणार आहेत,अशी खात्रीशीर माहिती दिली.

पोलिस अंमलदारांनी तत्काळ वाकडी येथे सापळा रचला आणि संशयित स्विफ्ट कार थांबवून, ५ संशयितांना ताब्यात घेतले,मात्र यातौल एक संशयीत आरोपी फरार झाला आहे.तपास पथकाने पंचासमक्ष आरोपींची अंगझडती घेतली.

झडती घेतल्यावर ३ लाख रूपयांची रोकड, ६० हजार रूपयांचे ४ मोबाईल, ४. ५० लाख रुपयांची स्विफ्ट कार क्रमांक एम एच-२०-सी सी-९५०० व हजार रुपयांची लोखंडी कत्ती असा एकूण ८.११ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

आरोपी आनंद अमर पवार याने इम्रान आयुब शहा याच्या सांगण्यावरून शादाब अब्बास शेख, रितेश बाबासाहेब आढाव व अमीत पठारे यांनी डाबर यांच्या मोटारसायकलला धडक देऊन, कत्तीचा धाक दाखवून रक्कम असलेली बॅग जबरीने लुटल्याची कबुली दिली.

याप्रकरणी आरोपी इम्रान आयुब शहा याला पोलिसांनी विश्वासात घेऊन, गुन्ह्यांबद्दल विचारपुस केली असता सूरज सोपान मुठे (२४, रा. मुठेवडगाव, ता. श्रीरामपूर) व ऋषीकेश ऊर्फ सोन्या किशोर पागीरे (२५, रा. कांदा मार्केटजवळ, श्रीरामपूर) हे दोघे कांदा मार्केटमध्ये काम करतात.

डावर हे दर महिन्याला मार्केट यार्डमधील व्यापाऱ्याकडून ५ ते ६ लाख रूपये मजुरांना पेमेंट करण्यासाठी मोटारसायकल वरून बॅगमधून ते घेऊन जातात,अशी माहिती मिळाली होती.इम्रान आयुब शहा व सूरज सोपान मुठे यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी ऋषीकेश किशोर पागीरे याच्या मदतीने डावर यांना लुटण्याचा कट रचला होता.

(दि.२८) रोजी डावर हे मार्केट यार्ड, येथून पैस घेऊन निघाल्याची माहिती ऋषीकेश पारि याने इम्रान शेख व सूरज मुठे यांना दिली. सूरज मुठे याने डावर हे मोटारसायकलवरून जात असताना त्यांचा पाठलाग केला.

इम्रान शेख याला डावर हे यांची मोटारसायकल दाखविली.इम्रान शेख व त्याच्या इतर साथीदारांनी डावर यांचा अस्तगाव रस्त्यापर्यंत पाठलाग करून,त्यांना नांदगावालगत लुटले,अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.चोरी केलेली काही रकम खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.

पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदारांनी यशस्वी केली.