बर्फाच्या कारखान्यात मागील २९ महिन्यात (जून २०२२ ते ऑक्टोबर २०२४) या कालावधीत एकूण ३५, ८८, ८६ युनिट विजेची चोरी करून, ६६ लाख ६५, ५०६ रुपयांचे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.प्रकरणी कोपरगाव औद्योगिक वसाहतीमधील समर्थ आईस फॅक्टरीचे अजय वाजे यांच्या विरुध्द श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज कंपनीचे (कल्याण ग्रामीण) चे उप कार्यकारी अभियंता देवेंद्र नलावडे, सहाय्यक राकेश कथे, वरिष्ठ तंत्रज प्रदीप फराड व प्रफुल्ल राऊत यांचे भरारी पथक कोपरगाव औद्योगिक वसाहतीतील (प्लॉट बि. ३८) मधील समर्थ आईस फॅक्टरी येथे वीज मीटर तपासणीसाठी गेले होते.
यावेळी वाल्मिक भोसले या व्यक्तीला वीजेचे पथक आल्याची चाहूल लागताच तो मीटर रुमच्या दिशेने धावला.त्याच्यामागे भरारी पथकातील वरिष्ठ तंत्रज्ञ धावत गेले.यावेळी मीटर रूमच्या गेटवर चढून भरारी पथकातील विद्युत सहायकांनी पाहिले असता,एसटीए हाय फ्रेकवेन्सी जनरेटर काळ्या रंगाचा आयताकृती बॉक्सवर काही संशयास्पद कृती करीत असल्याचे दिसले.
या कृतीचे विद्युत सहायकांनी छायाचित्रण केले. भोसले यांना कारखान्यात येण्याचे कारण सांगून, पथकातील अधिकाऱ्यांनी ओळख सांगितली.मीटरची तपासणी केली असता मीटर डिस्प्लेसह पल्स बंद असल्याचे अधिकाऱ्यांना दिसले.मीटरचा इनकमिंग करंट तपासला असता,कारखान्यात संपूर्ण विजेचा गैरवापर सुरु असल्याचे दिसले.हा प्रकार वीज चोरीचा असल्याचे वाजे यांना सांगण्यात आले.
समर्थ आईस फॅक्टरीत गेल्या २९ महिन्यात (जून २०२२ ते ऑक्टोबर २०२४) या दरम्यान ३५,८८, ८६ युनिट विजेची चोरी करून, ६६ लाख ६५ हजार ५०६ रुपयांच्या रक्कमेचे वीज वितरण कंपनीचे आर्थिक नुकसान करण्यात आले.याप्रकरणी उप कार्यकारी अभियंता देवेंद्र नलावडे यांनी श्रीरामपूर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी कोपरगाव येथील अजय गोविंदराव वाजेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.