बीड जिल्ह्यातील मस्साजोग तालुका केज येथील मराठा आंदोलक सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील राजकीय वरदहस्त असलेल्या मुख्य सूत्रधारास तात्काळ अटक करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी येथील अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत येथील अखंड मराठा समाजाच्या वतीने मराठा आंदोलक व समाजातील सेवक, बांधवांच्या वतीने तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळके यांना काल गुरूवारी (दि. १२) निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात म्हटले की, मस्साजोग येथील मराठा आंदोलक सरपंच संतोष देशमुख यांचे भरदिवसा अपहरण करून अतिशय निर्दयपणे त्यांचा खून करण्यात आला.

त्याचबरोबर त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आलेला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून उर्वरित राहिलेल्या आरोपींना तातडीने अटक करून जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी.त्याचबरोबर या आरोपींना राजकीय वरदहस्त देणाऱ्यांनाही आरोपी करावे.

सदरचे प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरित करून जलदगती न्यायालयात चालवावे. या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार शिवराज देशमुख व स्व. संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना पोलीस संरक्षण देऊन त्यांच्या कुटूंबाचे राज्य शासनाने पुनर्वसन करावे.

या मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करून निवेदनातील मागण्याची तात्काळ करून पूर्तता करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे.तसेच राज्यात मराठा समाजावर होणारे हल्ल्यावर प्रतिबंध बसण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालणे आवश्यक आहे.

त्याकरीता कडक उपाययोजना राज्य शासनाने करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.त्याचबरोबर बांगलादेश येथे हिंदू देवदेवतांची मंदिरे पाडण्यात आली. हिंदू बांधवांवर मोठ्या प्रमाणात झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी अखंड मराठा समाजाचे आंदोलक, मराठा सेवक नागेशभाई सावंत, सुरेश कांगुणे, संजय गांगड, राजेंद्र मोरगे, पंडितराव बोंबले, अण्णासाहेब डावखर, शरद नवले, दत्तात्रय जाधव, सुधाकर बोंबले, श्रीकृष्ण बडाख, अमोल बोंबले, सुधा तावडे, बाळासाहेब मेटे, रोहन डावखर, राजेंद्र भोसले, गोकुळ गायकवाड

विलासराव लबडे, संजय सोनवणे, बबन दाणे, अशोक पिसे, गणेश चौधरी, सुधीर गडाख, चंद्रकांत काळे, मनोहर शेळके, गणेश कदम, जयंत बोरुडे, धनंजय खंडागळे यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते.